Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 16:59 IST

घराच्या नेमप्लेटवर स्वत:चंच नाव नाही?

'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेतील खलनायिका अभिनेत्री रुपाली भोसलेचं (Rupali Bhosale) मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. रुपालीने ठाण्यात स्वत:च्या हक्काचं घर घेतलं आहे. यानिमित्त काल 29 जून रोजी तिने नवीन घराची वास्तुशांत केली. यावेळी मालिकेतील सहकलाकार आणि तिची इतर इंडस्ट्रीतील मित्रमंडळीही आली होती. रुपालीने तिच्या स्टाईलने हे घर सजवलं आहे. 

गुलाबी रंगाची नऊवारी, नथ, गळ्यात हार, कपाळावर चंद्रकोर, केसात गजरा अशा सुंदर लूकमध्ये रुपाली वास्तुशांतीसाठी तयार झाली.या कार्यक्रमासाठी तिने भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता. सुशांत शेलार, अभिषेक देशमुख, गौरी कुलकर्णीसह अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तिने घराविषयी माहिती दिली.  रुपालीने खूप विचार करुन तिच्या कुटुंबियांना कसं हवं आहे हे जाणून घेऊन घराचं इंटिरियर केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या घराच्या नेमप्लेटवर तिचं नाव नसून आई वडील आणि भावाचं नाव आहे. हे स्वप्न तिने कुटुंबासाठी पाहिलं होतं आणि ते आता पूर्ण झालं आहे. म्हणून तिने त्यांचंच नाव नेमप्लेटवर दिलं आहे असं ती म्हणाली.

रुपाली भोसले सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच तिची व्यक्तिरेखा खूप गाजली. शिवाय रुपालीची सोशल मीडियावर खूप क्रेझ आहे. तिच्या सौंदर्याची नेहमीच स्तुती होते. सध्या नवीन घर घेतल्याचा आनंद ती साजरा करत आहे. इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनीही तिचं अभिनंदन केलं आहे.

टॅग्स :रुपाली भोसलेमराठी अभिनेतासुंदर गृहनियोजनठाणेआई कुठे काय करते मालिका