Join us
Daily Top 2Weekly Top 5

“नितीन गडकरींना टॅग करुनही...”, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या तक्रारीनंतर मराठी अभिनेत्री नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 12:36 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील तिप्पट टोलवसुलीच्या तक्रारीनंतरही कोणताच प्रतिसाद नाही, अभिनेत्री म्हणते, “नितीन गडकरींना टॅग करुनही...”

मराठमोळी अभिनेत्री ऋजुता देशमुखने काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या टोलवसुलीचा अनुभव व्हिडिओद्वारे शेअर केला होता. ऋजुताला लोणावळा ते पुणे दरम्यान ८० ऐवजी २४० रुपये टाल आकारला गेला होता. तिप्पट टोल आकारला गेल्याने ऋजुताने संताप व्यक्त करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने महाराष्ट्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आयआरबीच्या सोशल मीडिया हॅडंल्सना टॅग केलं होतं. परंतु, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ऋतुजाने पुन्हा याबाबत व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

ऋतुजाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन या प्रकरणाच्या अपडेटबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने तक्रार केल्यानंतरही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याचं म्हटलं आहे. ऋतुजा म्हणते, “मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलवसुलीबाबतचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर मला अनेकांचे मेसेज आले. अनेकांनी त्यांच्या टोलवसुलीच्या पावत्या मला शेअर केल्या. तुमच्या मनातील गोष्ट बोलल्यामुळे तुम्ही हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे ही गोष्ट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली. आता मी माझ्याकडून हा विषय संपवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, याचं पुढे काहीच होताना मला दिसत नाहीये. आयआरबीकडून मला दोन फोन आले. माझ्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. पण, हा नियम आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. लोणावळ्यात तुम्ही गाडी थांबवली की ती एक्झिट होते. आणि मग जेव्हा तुम्ही लोणावळ्यात पुन्हा एन्ट्री घेता तेव्हा २४० रुपये टोल आकारला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. फास्टटॅग सुरू झाल्यापासून हा निर्णय असेल, तर त्यानंतर मी अनेकदा लोणावळ्यात गेले आहे. पण, याआधी असं कधीच झालं नाही. टोल किती जातोय, याकडे माझं व्यवस्थित लक्ष असतं. त्यामुळे माझ्याकडून पहिल्यांदाच असा टोल घेतला गेला आहे.”

तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...”

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...

“माझ्या व्हिडिओनंतर काही प्रेक्षकांनीही मला मेसेज आणि मेलकरुन त्यांच्याकडून २४०रुपये घेतलेले नाहीत, असं सांगितलं. मग काही जणांकडून २४० आणि काही जणांना ८० रुपये असा वेगळा नियम कसा? हाच माझा प्रश्न आहे. आयआरबीकडून मी जीआर मागवला होता. तो मी वाचला आहे. पण, त्यात कुठेही असा उल्लेख केलेला मला दिसला नाही. ही गोष्ट बदलण्यासाठी मी प्रयत्न केला होता. काही दिवसांनी ही गोष्ट बदलली तर आपल्या सगळ्यांनाच आनंद होईल. पण, आता तरी याचं काहीच होताना दिसत नाहीये. मी व्हिडिओ शेअर केला होता, तेव्हा मुख्यमंत्री, नितीन गडकरी अशा सगळ्या ऑफिशियल अकाऊंट्सना टॅग केलं होतं. पण, त्यांच्याकडूनही मला काहीच रिप्लाय आला नाही. आता पुढे काय होतंय ते पाहूया,” असंही तिने म्हटलं आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतानितीन गडकरीमुंबईपुणे