'लग्नाची बेडी' आणि 'अबोली' या मालिकांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री रसिका धामणकर (Rasika Dhamankar) यांना लेक अंतराने खास गिफ्ट दिलं आहे. तिने मुंबईत आईसाठी हक्काचं घर घेतलं आहे. रसिका धामणकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त तिने हे गिफ्ट दिलं. घराची झलकही तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. घराच्या बाल्कनीतून सुंदर नजारा बघायला मिळत आहे.
अंतरा धामणकरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले, "वडिलांचे अथक परिश्रम आणि आईचं प्रेम, माया यामुळे आमचं घर नेहमीच एक सुंदर वास्तू राहिली. पण लहानपणापासूनच मी स्वत:चं घर असावं असं स्वप्न पाहिलं. मुंबईत आपलं घर...हे मी स्वत:लाच दिलेलं वचन होतं. ते घर मला आईला गिफ्ट द्यायचं होतं. आज वयाच्या २८ व्या वर्षी ते स्वप्न पूर्ण झालं आहे. २०२५ हे मनाने, कष्टाने आणि प्रार्थनेने काहीतरी घडवण्याचं वर्ष बनलं. याचं श्रेय माझ्या आईवडिलांना देते. आईसाठी एक नवं घर...मेहनत आणि संयमाचं फळ. आई, हे तुझ्यासाठी...खूप प्रेम."
लेकीच्या या पोस्टवर अभिनेत्री रसिका धामणकर यांनी कमेंट करत लिहिले,'या सुंदर गिफ्टसाठी खूप आभार..खूप प्रेम आणि आशीर्वाद.' तसंच इतरांनीही तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. या वयात तिने इतकी मोठी झेप घेतल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
रसिका धामणकर या मूळच्या वर्धाच्या आहेत. घर, संसार सांभाळत त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर घडवलं. 'लग्नाची बेडी'मधील त्यांची राजश्री ही भूमिका गाजली. तर आता त्या 'अबोली' मालिकेत दिसत आहेत. 'वहिनीसाहेब','एक होती राजकन्या','प्रेम पॉयझन पंगा' या मालिकांमध्येही त्या दिसल्या. तर 'जय भवानी','गडद जांभळं','एक कुतूब तीन मिनार','सूर्या' या सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं.