Marathi Serial: अलिकडच्या काळात छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सध्या या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट तसेच महासंगम शिवाय बऱ्याचदा पाहुण्या कलाकारांची एन्ट्रीही पाहायला मिळते. अशातच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळते आहे.
झी मराठी वाहिनीवर येत्या २७ जुलैपासून पारू आणि लक्ष्मीनिवास या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. या महासंगमध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख असणाऱ्या निर्मिती सावंत दिसणार आहे. जवळपास २ दोन वर्षानंतर निर्मिती सावंत यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. पद्मावती असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. "अहिल्या आणि लक्ष्मीला भेटायला येतेय 'पद्मावती'...", असं खास कॅप्शन देत सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीकडून प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. आता कोल्हापूरच्या पद्मावतीच्या येण्याने अहिल्या आणि लक्ष्मीच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सध्या निर्मिती सावंत यांचं रंगभूमीवर 'आजीबाई जोरात' हे नाटक जोरदार सुरु आहे. त्यात आता छोट्या पडद्यावर त्यांची एन्ट्री झाली आहे.