Amruta Deshmukh Opens Up on Breakups: हिंदू धर्मामध्ये जन्म कुंडलीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनेक लोक आजही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, विशेषतः लग्नासारख्या पवित्र बंधनासाठी, कुंडलीवर विश्वास ठेवतात. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, वर-वधूचे गुण जुळतात की नाही हे पाहण्यासाठी पत्रिका तपासल्या जातात. अनेकदा, जर कुंडलीतील ग्रह-तारे जुळले नाहीत, तर ठरलेली लग्नंही मोडतात. हे फक्त मान्य लोकांसोबत नाही तर सेलिब्रिटींसोबतही घडतं. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) हिच्यासोबतही असेच घडले आहे. फक्त कुंडली जुळली नाही म्हणून मराठी अभिनेत्री अमृता देशमुखचं ब्रेकअप झालं होतं.
अमृता देशमुख हिनं नुकतंच 'सर्व काही'ला मुलाखत दिली. अमृता ही तिचा नवरा अभिनेता प्रसाद जवादेला भेटण्यापूर्वीच्या एका रिलेशनशिपमध्ये होती. पण, कुंडली न जुळल्यामुळे तिचं ब्रेकअप झाल्याचं तिनं या मुलाखतीमध्ये सांगितलं. अमृता म्हणाली, "मी एका रिलेशनशिपमध्ये होते. पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्याचं कारण कुंडली होतं, जे खूपच अनपेक्षित होतं. जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर दोन-अडीच वर्षांचा सहवास असतो, एकमेकांना तुम्ही जाणून घेता, सगळं गुण-दोष जाणून घेता, तेव्हा एवढं करूनही ग्रह ठरवणार की, तुम्ही एकत्र राहणार की नाही? मला या गोष्टीबद्दल फक्त कुतूहल वाटतं".
पुढे ती म्हणाली, "जेव्हा प्रसाद आणि मी ठरवलं होतं की, आम्ही एकमेकांबरोबर राहणार आहोत. आमचं प्रेम आहे एकमेकांवर तेव्हा आम्ही पत्रिका वगैरे पाहिली नाही. कारण, आपल्या विचारांशी आपणच का खेळायचं. नंतर या गोष्टी आपल्या डोक्यात राहतात. जेव्हा काही घडतं तेव्हा आपणही विचार करू लागतो की, हे आपल्याला सांगितलं होतं आधीच, ते तसंच घडतंय काय? त्यापेक्षा जर एकमेकांबरोबर राहायचं ठरवलं आहे आणि माहितीये की, चढ-उतार काय आयुष्यात येणारच आहेत. मग कशाला ग्रह वगैरे गोष्टी हव्यात".