काश्मिरमधील पहलगाम हल्ल्याचा भारताने काल मध्यरात्री बदला घेतला. भारताने एअर स्ट्राईक करत पीओकेमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त केले. 'ऑपरेशन सिंदूर' असं या एअर फोर्सच्या कामगिरीला नाव देण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक होत आहे. मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आहे.
अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "आणि आता मात्र ज्यांना पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं. घरातला आतंक आधी संपवायला हवा. मग बाहेरचा. जय हिंद."
देशातील अंतर्गत वादावर बोट ठेवत अदितीने या पोस्टमधून सुनावलं आहे. याआधीही अदितीने अनेक विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला. यानंतर आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांना तिने थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. अदितीची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
अदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. तर 'बाईपण भारी देवा' या सिनेमातील मंगळागौर गाण्यामुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली होती. सिनेमातील 'मंगळागौर' गाणं अदितीने स्वत: लिहिलं होतं