कलाकार कायमच त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. यासाठी कलाकार नियमित व्यायाम करतात. सेलिब्रिटींच्या दृष्टीने आरोग्याबरोबरच त्यांच्या कामासाठीही फिटनेस ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच अनेकदा सेलिब्रिटींचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हायला होतं. आता अशाच एका मराठी अभिनेत्याने चक्क एका वर्षात बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याचं हे बदललेलं रुप पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
हा अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर आहे. संकेतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय काही सिनेमांमध्येही तो झळकला आहे. नुकतंच संकेतचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्याने लाइफ अपडेट देताना खास पोस्ट शेअर केली. तो म्हणतो, "आज माझा वाढदिवस आणि ह्यावर्षी मी स्वतःला अशी भेट दिली आहे. जी पैसे देऊन मुळीच विकत घेता येणार नाही. ते म्हणजे एक उत्तम शरीर, एकांत, शांत डोकं आणि कमाल mindset. गेल्या ४ महिन्यांत अनेक प्रॉब्लेम्स आले. अगदी माझ्या लाखोंच्या फोनची लूटमार , कारचे मेजर अक्सिडेंट ते युट्यूब चॅनेलवर स्ट्राईकसुध्दा लागला. पण फक्त तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने, सकारात्मक ऊर्जेमुळे आणि योग्य mindset मुळे हे सगळे प्रॉब्लेम्स माझ्यासाठी अतिशय क्षुल्लक ठरले आहेत. माझे काम मुळीच थांबलेले नाही हे तुम्हाला माझ्या व्हिडिओजकडे बघून दिसतच असेल. मुळात आपण फक्त स्वतःसोबत स्पर्धा करायची ठरवली की आपल्या यशाची रेषा आपसूकच देव वाढवायला सुरुवात करतो हे मी स्वतः अनुभवले आहे".
"स्वतःला योग्य वेळ द्यायला लागल्यापासून आजकाल अडचणी जरी आल्या तरी तेवढ्यापुरते वाईट वाटते. पण त्रास मुळीच होत नाही. हा वाढदिवस खूप स्पेशल आहे कारण मला “मी” सापडलोय. सगळ्या यातना भोगून सगळ्या प्रकारची दुःख पाहून एकतिशी ओलांडली आहे. समाज कळला आहे माणसं कळली आहेत. पण ह्या सगळ्यासोबत मी खोटं खोटं वागून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयास मुळीच करणार नाहीये. आयुष्य फार लहान आहे. जितके आहे तितके खरेपणाने घालवूयात. बाकी तुम्हा सर्वांचे प्रेम मिळाले आहे आणि मी ऋणी आहे की माझा प्रेक्षकवर्ग खूप खरा आहे. धन्यवाद… चला.. निघतो सायकलिंग करायची आहे १५ किलोमीटर.. पुढच्या वर्षी याहून कमाल फोटो पोस्ट करायचा आहे", असंही त्याने पुढे म्हटलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी संकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.