दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटी मुहुर्त गाठत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच काही मराठी सेलिब्रिटींनीही मोठ्या धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राजेशिर्केने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. १७ नोव्हेंबरला त्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. त्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नानंतर आता सत्यनारायण पूजेचा एक व्हिडिओ निखिलने शेअर केला आहे.
लग्नानंतर निखिलची सत्यनारायण पूजा पार पडली. यावेळी निखिलने त्याच्या पत्नीसाठी खास उखाणा घेतला. मात्र हा उखाणा घेताना त्याची बोबडी वळलेली पाहायला मिळाली. याचा मजेशीर व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. निखिलने उखाणा घेताना सुरुवातच चुकीची केली. "चमचमत्या आकाशात निळे निळे तारे..." असं म्हटल्यानंतर एकच हशा पिकल्याचं दिसलं. त्यानंतर निखिलच्या पत्नीने त्याला योग्य उखाणा सांगितला. "निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे, चैत्रालीचं नाव घेतो लक्ष द्या सारे" असा उखाणा निखिलने घेतला. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. "पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता...मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.
दरम्यान, निखिलने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्हीवरील तो लोकप्रिय चेहरा आहे. 'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने अनेक सिनेमांतही काम केलं आहे.