Join us

"आम्हाला मरायची इच्छा नाही...", मढमधील रस्त्याबद्दल शशांक केतकरचा संताप, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:16 IST

मढमधील रस्त्याबाबत शशांक केतकरने व्यक्त केला संताप, म्हणाला- "हा फक्त कंटाळा..."

Shashank Ketkar :  अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. शशांक सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्याचं मत मांडत असतो. अनेकदा सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया देतो. शशांकने मांडलेल्या मतांवरून काहीवेळा प्रशासनाकडून दखलसुद्धा घेतली गेली आहे. अशातच नुकताच त्याने मढमधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

शशांकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "पावसाळ्याचे दिवस येत आहेत. रस्त्यांवरील लाईट्स बंद असतील, धो-धो पाऊस पडत असेल आणि आम्हाला रस्त्याच्या मध्यभागी असलेली झाडे दिसलीच नाही तर... मला कल्पना आहे की, अनेकांसाठी मी जो हा असा आवाज उठवतो, तो हास्यास्पद असेल, पण प्रत्येकाला मनातून कुठेतरी पटत असतं. ही अशी परिस्थिती आपल्याला मुबंईत महाराष्ट्रात,भारता अगदी प्रत्येक रस्तावर दिसते. डेव्हलपमेंन्ट खूप होत आहे, हे मान्य आहे. पण, हा काय भ्रष्टाचार सुद्धा नाही. हा फक्त निष्काळजीपणा आहे. मढ आयलंडचा हा रस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आला आहे. हा रस्ता करताना काही झाडे तोडली, पण ही दोन झाडे का ठेवण्यात आली आहेत? हे कोडं मला सुटलेलं नाही. जपानमध्ये झाडे मुळापासून तोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लावण्याची पद्धत आहे, ही अपेक्षाच नाही आणि झाडे तोडून तुम्ही रस्ता करा, या मताचीही मी नाही. पण, आता तुम्ही हा रस्ता केलाच आहात, मग ही दोन झाडे का ठेवली आहेत? म्हणजे ही झाडे रस्त्याची शोभा वाढवतायत की, दुभाजकाचं काम करत आहेत, हेच मला कळत नाहीत."

पुढे अभिनेता म्हणाला, "जमलं तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर लावा आणि ते ऑनलाईन मिळतात. त्यांची लिंक हवं तर मी देतो. त्याचं बजेट अजून निघालेलं नसेल, किंवा त्याचं कंत्रात अजून कोणाला दिलेलं नसेल तर ते मला घ्या. शशांक केतकर यांच्याकडून असं लिहिलेलं दोन रिफ्लेक्टर तरी झाडाला लावा. म्हणजे आमच्या गाड्यांचे रिफ्लेक्टर त्यावर पडतील आणि आम्हाला ती झाडे दिसतील."

आम्हाला मरायची इच्छा नाही...

"आम्हाला मरायची इच्छा नाही. तुम्हाला आमची काळजी नसली तरी आम्हाला आमची काळजी आहे. त्यामुळे दोन रिफ्लेक्टर मागवा आणि ते या झाडांना लावा किंवा या झाडांचं काहीतरी करा. कारण, ही झाडे रस्त्याच्या मध्येही नाहीत किंवा बाजूलाही नाहीत. त्या या त्यांना कुठलेही रिफ्लेक्टरसुद्धा नाहीत." असं म्हणत शशांकने मढमधील रस्त्याचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया