Join us

"तुमचा हात पाठीवर असणं...", भरत जाधव यांच्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:45 IST

भरत जाधव हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खास पोस्ट शेअर केली आहे.

दमदार अभिनय, उत्कृष्ट संवादफेक आणि अचूक टायमिंगचं परफेक्ट ज्ञान असलेले अभिनेते म्हणजे भरत जाधव. अभिनयातील नवे 'डावपेच' आणि अक्शनचा 'जबरदस्त' तडका देत 'साडे माडे तीन' म्हणत 'सही रे सही'ची 'खबरदार' ग्वाही देणाऱ्या भरत जाधव यांनी प्रेक्षकांना पछाडलं. सामान्य घरात जन्मलेल्या भरत जाधव यांची अभिनय क्षेत्रातील 'क्षणभर विश्रांती' न घेता केलेली 'उलाढाल' पाहून चाहत्यांच्या तोंडातून 'अगं बाई अरेच्चा' असेच उद्गार येतील. 'शिक्षणाच्या आयचा घो' म्हणत 'वेड्यांची जत्रा' मांडलेल्या सगळ्यांच्या लाडक्या भरत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. 

भरत जाधव हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खास पोस्ट शेअर केली आहे. गौरव मोरेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन भरत जाधव यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भरत जाधव यांनी गौरवच्या खांद्यावर हात ठेवल्याचं दिसत आहे. "तुमचा हात पाठीवर असणं ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही…सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा," असं म्हणत गौरवने भरत जाधव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

शाहीर साबळेंच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमातून भरत जाधव यांनी अभिनयातील कराकीर्दीला सुरुवात केली होती. या कार्यक्रमातून मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि भरत जाधव हे नाव महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर कोरलं. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. भरत जाधव यांनी ‘भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लि.’ ही स्वत:ची निर्मिती कंपनीही सुरू केली आहे. त्याबरोबरच स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन असणारे ते पहिले मराठी कलाकार आहेत. सध्या ते अस्तित्व या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :भरत जाधवमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता