उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे अनंत जोग. मराठीसह हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे अनंत जोग लवकरच 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या ऐतिहासिक मालिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून चे बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्याकडे वळणार आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा नव्या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.
छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं असून यात अनंत जोग महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेत अनंत जोग राणी चेन्नम्माच्या प्रधान सेवकाची भूमिका साकारणार आहेत.
अनंत जोग या मालिकेत राणी चेन्नमाचे प्रधान सेवक तिम्मण्णा ही भूमिका साकारतांना दिसणार आहेत. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोचली असून औरंगजेबाला चकवा देत, राजाराम राजेंना जिंजीला सुरक्षित पोचवायचे, जेणेकरून त्याचे सैन्य विभागले जाईल आणि कमी सैन्यबळानिशी त्याच्याशी लढता येईल म्हणून सौदामिनी ताराराणी आता बेदनूरची राणी चेन्नम्मा ह्यांची मदत घेण्याचे ठरवतात.
दरम्यान, राणी चेन्नम्माला तिच्या राज्याची घडी बसवण्यात छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या मदतीची पूर्ण जाणीव, मनात प्रचंड आदर आणि स्वराज्यप्रेम असते, पण मध्ये आडकाठी असते ती चेन्नम्माचा प्रधान सेवक तिम्मण्णा याची. तिम्मण्णा हा स्त्रीद्वेष्टा असून तो सतत राणी चेन्नम्मावर आपली मत लादत असतो. इतंकच नाही तर स्वराज्य आता संपलंय असंही तो तिला सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे या नव्या भूमिकेला अनंत जोग त्यांच्या अभिनयाने नक्कीच चार चाँद लावतील यात काही दुमत नसल्याचं पाहायला मिळत आहे.