सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कुंभमेळ्याने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. १४४ वर्षांनी आलेला हा योग चुकू नये म्हणून रोज लाखो भाविक प्रयागराज येथे दाखल होत कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही महाकुंभमेळ्यात हजेरी लावत गंगेत डुबकी मारली. आता 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेताही प्रयागराजला पोहोचला आहे.
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता अमोल नाईक महाकुंभमेळ्यात सहभागी झाला आहे. कुंभमेळ्यात गेल्यानंतर त्याने गंगेत डुबकी मारत पवित्र स्नान केलं. याचा व्हिडिओ अभिनेत्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. "महाकुंभ: एक अशी जागा, जिथे सांस्कृतिक विविधतेचा साक्षात्कार होतो आणि आपल्या वारशाचा अभिमान जागृत होतो. हर हर महादेव...हर हर गंगे", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत.
अमोल नाईकला 'तुझ्यात जीव रंगला'मुळे प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत त्याने राणादाचा मित्र बरकतची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'सुंदरी' या मालिकेतही तो दिसला होता. तर स्टार प्लसवरील 'माती से बंधी डोर' मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.