Join us

"हा युद्धनीतीतला जालीम उपाय...", दहशतवादाविरुद्ध सरकारच्या निर्णयाला मराठी अभिनेत्याचा पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:52 IST

दहशतवादाविरुद्ध सरकारच्या निर्णयाला मराठी अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाला- "शत्रूचं पाणी तोडून जेरीस आणणं..."

Aastad Kale: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभरातच नाहीतर जगभरात उमटत आहेत. या नरसंहारामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानाची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जोवर थांबत नाहीत तोवर दोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यावर आता मराठी अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. 

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी आणि कटाच्या सूत्रधारांविरोधात कारवाई करण्यासाठी क्रेंद सरकारने जो निर्णय घेतला त्याला अभिनेता आस्ताद काळेने पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान,आस्ताद काळेने त्याच्या फेसबुक अकाउंटवर मोजक्या शब्दांत पोस्ट लिहून त्यामध्ये म्हटलंय, "शत्रूचं पाणी तोडून जेरीस आणणं हा युद्धनीतीतला अतिशय प्राचीन असा जालीम उपाय आहे. त्यात आता मे महिन्यातली आग बरसणार आहे." अभिनेत्याही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे.

दरम्यान, काश्मीरमधील या हल्ल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लाटेलिव्हिजनसेलिब्रिटीजम्मू-काश्मीर