Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी, ट्रेलरमध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 16:58 IST

मराठमोळ्या रसिका वेंगुर्लेकरची बॉलिवूड सिनेमात एन्ट्री, पाहा ट्रेलर

अभिनयाला विनोदाची झालर लावून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा लोकप्रिय मराठी शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर. उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिकाने तिची स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. हास्यजत्रेआधी अनेक मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. याबरोबरच हिंदी मालिकांमध्येही ती झळकली होती. आता रसिकाची थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. 

रसिका वेंगुर्लेकरचं नशीब उजळलं आहे. एक मोठा बॉलिवूड सिनेमा रसिकाच्या हाती लागला आहे. 'मुंज्या' या हॉरर बॉलिवूड सिनेमात मराठमोळी रसिका दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रसिकाची झलक पाहायला मिळाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रसिकाने या सिनेमाचा भाग असल्याबद्दल आनंदी असल्याचं म्हटलं आहे. रसिका या सिनेमात छोटीशी भूमिका साकारताना दिसणार आहे. 'मुंज्या' सिनेमात ती नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार हे समजलेलं नाही. पण, तिला बॉलिवूड सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या सिनेमात रसिकाबरोबर अनेक मराठी कलाकार दिसणार आहे. शर्वरी वाघ, भाग्यश्री लिमये, सुहास जोशी या मराठी अभिनेत्री सिनेमात झळकणार आहेत. 'मुंज्या' सिनेमात मोना सिंह, अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. ७ जून रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

रसिका 'देवयानी', 'दिल दोस्ती दुनियादारी', 'फ्रेशर्स' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. 'बाकरवडी' या मालिकेत रसिका दिसली होती. पण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारसिनेमा