'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोने अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली. अभिनेता निखिल बनेलादेखील या शोमुळे प्रसिद्धी मिळाली. निखिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. त्याच्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. कोकणात गाव असलेल्या निखिलचं कोकणी प्रेम काही लपून राहिलेलं नाही. अनेकदा तो त्याच्या गावची झलक व्हिडीओतून दाखवत असतो. आतादेखील निखिल कोकणात गेला होता. मात्र यावेळी तो त्याच्या स्वत:च्या गावी नव्हे तर कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या युट्यूबर प्रसाद गावडेच्या जीवनशाळेत गेला होता.
निखिलने याचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने कोकणातील निसर्गाची सुंदर झलकही दाखवली आहे. कोकणात गेल्यावर निखिल शेतीकामात रमला होता. त्याने भात लावणी केली. निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो शेतात काम करत असल्याचं दिसत आहे. पहिल्यांदाच भातलावणी केल्याचं निखिलने सांगितलं. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
दरम्यान, निखिल बने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. काही सिनेमांमध्येही तो झळकला आहे. 'बॉईज ४', 'चिकीचिकी बू बूम बूम' या सिनेमांमध्ये निखिल दिसला होता. पौर्णिमेचा फेरा या हॉरर कॉमेडी वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. अलिकडेच या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.