माधवी जुवेकर हा मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री असण्यासोबतच माधवी बेस्ट कर्मचारी आहे. २०१७ मध्ये माधवीचा बेस्टच्या ऑफिसमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये काही कर्मचाऱ्यांसोबत ती पैसे उडवून डान्स करताना दिसत होती. त्या व्हायरल व्हिडीओवर आता अभिनेत्रीने इतक्या वर्षांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माधवीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने २०१७ मध्ये घडलेल्या त्या घटनेचा उल्लेख केला. माधवी म्हणाली, "जेव्हा ही घटना घडली त्या रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले होते. त्यांनी मला विचारलं की जे घडलंय ते खरं सांगा. मी त्यांना म्हटलं की मीच कशाला तुम्ही कोणालाही विचारा काय घडलंय. तेव्हा मंत्र्यांनी मला शाश्वती दिली होती की हे इंडस्ट्रियल मॅटर आहे आणि हे कुठेच स्टँड होऊ शकत नाही. आपण जर बाहेरून गेलो. तर अब्रू नुकसानीचा दावा करू शकतो असं त्यांनी मला सांगितलं. मला उज्ज्वल निकमांच्या ऑफिसमधूनही फोन आला होता. त्यांनीही मला सांगितलं होतं की मुळात पैशावर नाचणं ही चूकच नाही".
पुढे स्पष्टीकरण देत माधवी म्हणाली, "मी खरंच खऱ्या पैशावर नाचले नव्हते. बाकीच्यांचं जाऊ दे पण मला नैतिकता नाही का? मी आयुष्यात कधीच पैशावर नाचू शकत नाही. तो आमचा नाटकाचा दसरा होता. मी फिल्डमध्ये आहे तर मला सगळं करायला मिळतं. आमच्याकडे अशाही बायका आहेत ज्यांचे नवरे नाहीत. तो एक दिवस त्यांचा असतो. इतके वर्ष त्या खूर्चीवर उभं राहून कागदाच्या कपट्या उडवायच्या. त्यादिवशी दोन दिवस आधी चिल्ड्रन्स नोट आली होती".
"मी तेव्हाही खरी होते आताही आहे. मला तेव्हा स्वत:चं टेन्शन नव्हतं. पण, बाकीच्यांचं आलं होतं. आम्ही जे १३ जण होतो त्यातल्या बाकीच्यांना कोणी ओळखत नव्हतं. पण, मला सगळे ओळखत होते. पण, मला माहित होतं की मी खरी आहे. आणि मी परत येणारच. फरक फक्त एवढाच की मीडियाने असं का केलं मला माहित नाही. त्यांनी मला आधी विचारायला हवं होतं. जे आरोप केले ते चुकीचं होतं. शहानिशा करायला हवी होती", असंही माधवी म्हणाली.