अत्यंत खडतर प्रवास आणि आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना केलेल्या कश्मिरा कुलकर्णीने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या कश्मिरा स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे. तिने चार दिवस सासूचे, काव्यांजली, श्री गुरुदेव दत्त अशा मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. मराठी, हिंदीसोबतच काही साऊथ चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कश्मिराने तिच्या आयुष्यातील अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.
कश्मिराने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. आईवडीलांचं निधन झाल्यानंतर कश्मिराच्या वाट्याला खूप हलाखीचं जीवन आलं. तिला दोन वेळचं जेवणही मिळायचं नाही. म्हणूनच कश्मिराने अभिनयासोबतच गरजू लोकांची मदत करण्याचं ठरवलं. असाच एक प्रसंग अभिनेत्रीने सांगितला. ती म्हणाली, "मला खूप मोठं अन्नछात्र काढायचं आहे की आजूबाजूची माणसं उपाशी नाही राहिली पाहिजे. कारण आपण ते उपाशी राहणं बघितलंय. पण, एकदा रायगड जिल्ह्यात आम्ही मेडिकल कॅम्पसाठी गेलो होतो. तिथे एक छोटासा मुलगा आला. जनरली डॉक्टरांना बघून खेडेगावातली मुलं घाबरतात. तर मग आमचं ठरलेलं असतं की थोडा वेळ डॉक्टर गाडीत बसतात आणि मग आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो. मग त्यांना चॉकलेट वगैरे देऊन ते नॉर्मल झाले की मग डॉक्टर येऊन त्यांना तपासतात".
"त्या लहान मुलाला मी जेवलास का विचारल्यावर तो म्हणाला की हो मी उंदीर खाल्ला. आणि माझ्या अंगावर काटा आला. तिथे एक मावशी बसलेल्या त्या म्हणाल्या की त्याचे आईवडील वगैरे कोणी नाहीत. इथेच काही पडलेलं असेल ते तो खातो. पण माझं असं झालं की तरी उंदीर?? मग म्हटलं याच्या घरी दुसरं कोणीच नाहीये का? तर काका आणि मावशी वगैरे आहेत. मग त्याच्या घरातले आले. त्याच्या मावशीचं असं म्हणणं होतं की सरकार आता दर महिन्याला धान्य देतं. मग पुरुषांची अशी विचारसरणी झालीये की तुला घरात शिजवायला अन्न मिळतं तर आता माझ्याकडे पैसे नाही मागायचे. मग काही कमवयाचं नाही आणि कमावलं तरी ते पैसे दारूवर उडवायचे", असं तिने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "मग मी म्हटलं की नाही जर का आपण अन्न पुरवलं. तर मग ते काम करणार नाहीत. मग मी ठरवलं की नाही आपण असं काहीतरी करुया की जेणेकरुन त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत होईल. रेडीमेड गोष्टी हातात द्यायच्या नाहीत. त्यानंतर मग मी सुकन्या भांडारउद्योग सुरू केलं. त्यातून मग मसाले बनवणं, कॅटरिंगच्या ऑर्डर घेणं. बाकी सीझनप्रमाणे गोष्टी सुरू असतात. यातून त्यांनी स्वावलंबी व्हावं आणि स्वत:च्या पायावर उभं राहावं हेच उद्दीष्ट होतं",