Join us
Daily Top 2Weekly Top 5

कास्टिंग काऊचला कंटाळल्यामुळे या टिव्ही अभिनेत्रीने सोडले अभिनयक्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:02 IST

अनेक मालिकांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

ठळक मुद्देकाम करायचे असल्यास मला कॉम्प्रोमाईज करावे लागेल असे मला सांगण्यात आले होते. एका कास्टिंग डायरेक्टरने तर माझ्यासोबत हॉटेलमध्ये चल... मला खूश कर... असे मला सांगितले होते. या सगळ्या गोष्टी ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता.

खिचडी या मालिकेला आज अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. या मालिकेत प्रफुल्ल आणि हंसाच्या मुलीच्या म्हणजेच चकीच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री रिचा भद्राला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील बडे लोग... बडे लाग हा तिचा संवाद चांगलाच गाजला होता. या मालिकेनंतर तिने बा बहू और बेबी, मिसेस. तेंडुलकर, गुमराह यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.

रिचाला बालकलाकार म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण आता रिचा अभिनय क्षेत्रापासून कित्येक वर्षं दूर आहे. तिने अभिनय क्षेत्र सोडण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत रिचाने सांगितले आहे की, मी बालकलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केले. मी लहानपणापासूनच हेल्दी आहे. आजकालच्या अभिनेत्रींप्रमाणे मी बारीक नाहीये. मी जाडी असल्याने मला त्याचप्रकारच्या रोलविषयी विचारण्यात येत असे. मला कोणत्याही भूमिकेत अडकून राहायचे नव्हते. या क्षेत्रात करियर करायचे असेल तर वजन कमी करण्याची तुला गरज आहे असे मला सांगण्यात येत असे. पण केवळ या इंडस्ट्रीत करियर करण्यासाठी वजन कमी करणे मला पटत नव्हते. तसेच रोमँटिक सीन करायचा नाही अथवा कोणत्याही प्रकारे स्वतःला एक्सपोझ करायचे नाही असे माझ्या कुटुंबियांचे म्हणणे होते. त्यामुळे माझ्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मला कोणतीच गोष्ट करायची नव्हती.

माझे आता लग्न झाले असून मी कॉर्पोरेट जगतात माझे करियर करत आहे. लग्नानंतर मी काही भूमिकांसाठी ऑडिशन्स देण्यासाठी गेले होते. पण काम करायचे असल्यास मला कॉम्प्रोमाईज करावे लागेल असे मला सांगण्यात आले होते. एका कास्टिंग डायरेक्टरने तर माझ्यासोबत हॉटेलमध्ये चल... मला खूश कर... असे मला सांगितले होते. या सगळ्या गोष्टी ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता.

टॅग्स :टेलिव्हिजन