Join us
Daily Top 2Weekly Top 5

काव्यांजली: प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 19:35 IST

Kavyanjali: नेमकी काय आहे काव्या आणि अंजलीची स्टोरी? लवकरच होणार उलगडा

छोट्या पडद्यावर कायम नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यात लवकरच काव्यांजली ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ही मालिका दोन बहिणींच्या नात्यावर आधारित असून त्यांच्यातील सुंदर नातं यात उलगडलं जाणार आहे. यात आपल्या धाकट्या बहिणीसाठी काव्या लग्नासाठी स्थळ शोधत आहे. पण, अंजलीला योग्य जोडीदार मिळेल की नाही या मालिकेतून कळणार आहे.

असं कोणी लिहून ठेवलं आहे का की सख्याच बहिणी मध्ये जिव्हाळ्याच नातं असतं ? काव्या आणि अंजली या सख्या बहिणी नसल्या तरीदेखील प्रेमाच्या धाग्यात गुंफलेल्या नात्याच्या घट्ट वीणेने त्यांना एकमेकींशी बांधून ठेवलं आहे. त्यांच्यातील दृढ विश्वास आणि नितांत प्रेम हे कधीच कमी झालं नाही. या दोघींचं नातं कसं आहे ? कसं आहे या बहिणींचं विश्व ? समोर आलेल्या अडचणींना कशा त्या मिळून सामोऱ्या जातात ? काय आहे या काव्यांजलीची गोष्ट हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत काव्या प्रेभुदेसाईची भूमिका कश्मीरा कुलकर्णी तर अंजली दिवेकरची भूमिका प्राप्ती रेडकर साकारणार आहे.

काव्या आणि अंजली या दोघी चुलत बहिणी असल्या तरीदेखील त्यांचं नातं आई - मुलीसारखं आहे. अंजलीचा जन्म झाल्यापासून ती काव्याची मानसकन्या झाली. काव्याचं लग्न झाल्यावर अंजलीने घराची जबाबदारी उचलली. काव्या सासरी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख निभावते आहे, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नवऱ्याच्या प्रेमासाठी, त्याच्याकडून मिळणाऱ्या थोड्या मानासाठी आसुसली आहे. ते आज न उद्या तिला मिळेल, या आशेवर ती जगतेय. अंजलीचं ठरलं आहे तिला विश्वजित सारखा नवरा नको आहे, ज्याला कुठेतरी काव्या देखील समर्थन देत आहे. या दोन बहिणींच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे ? अंजलीला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मिळेल ? काव्या अंजलीसाठी योग्य मुलगा शोधू शकेल? काव्या तिचा मान सासरी मिळवू शकेल ? विश्वजित काव्याला आपलंस करेल ? हे लवकरच या मालिकेतून उलगडणार आहे.  ही मालिका येत्या २९ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी