Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ohhh! शाहरुखबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर लेक सुहाना चुकली; अमिताभ यांनी 'शाळा' घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:35 IST

Suhana khan: सुहानाची KBC15 मध्ये फजिती; वडिलांविषय़ी विचारलेल्या प्रश्नाचं देऊ शकली नाही उत्तर

बॉलिवूडचा मेगास्टार अर्थात अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांचा केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती हा शो आज देशभरात लोकप्रिय आहे. या शोने अनेकांना कोटयधीश व्हायचं स्वप्न दाखवलं आणि काहीचं ते स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. त्यामुळे या शोची कायम प्रेक्षकांमध्ये चर्चा असते. आतापर्यंत या कार्यक्रमात सामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे. यावेळी या कार्यक्रमात 'द आर्चीज' या सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यात शाहरुखची लेक सुहाना खान हिचाही समावेश होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुहानाला शाहरुखविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्या प्रश्नाचं उत्तरं तिला देता आलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या एकाच चर्चेला उधाण आलं आहे.

सुहाना (suhana khan) आणि शाहरुख (shahrukh khan) यांच्या बॉण्डिंगविषयी फार काही वेगळं सांगायची गरज नाही. शाहरुख आपल्या लेकीबाबत प्रचंड पझेसिव्ह आहे. त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी तिला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो. मात्र, इतकं प्रेम करणाऱ्या वडिलांविषयी सुहानाला काहीच माहित नाही. केबीसीमध्ये शो सुरु असताना सुहानाला शाहरुखच्या करिअरशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं तिने चुकीचं उत्तर दिलं ज्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागत आहे.

या प्रश्नाचं दिलं सुहानाने चुकीचं उत्तर

सुहाना खान हिने केबीसीच्या मंचावर हजेरी लावल्यानंतर बिग बींनी तिची ओळख करुन दिली. जे लोक सुहानाला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, ही अभिनेता शाहरुख खान यांची लेक आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले. त्यानंतर त्यांनी सुपर संदूक हा राऊंड सुरु केला.  यात 'खालील दिलेल्या पैकी कोणता पुरस्कार शाहरुखला मिळालेला नाही?' असा प्रश्न सुहानाला विचारण्यात आला. यासाठी A. पद्म श्री, B. लीजन ऑफ ऑनर आणि C. एल'एटोइल डी'ओर, D. वोल्पी कप असे चार पर्यायही तिला सुचवण्यात आले होते. 

यापैकी सुहाना A म्हणजेच पद्धश्री या उत्तराची निवड करते. मात्र, तिचं हे उत्तरं चुकतं. शाहरुखला D म्हणजेच वोल्पी कप हा पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाही.  तिने चुकीचं उत्तर दिल्यानंतर दिग्दर्शिका झोया अख्तर, वेदांग आणि  अमिताभ बच्चन थक्क होतात.

दरम्यान, सुहानाचं उत्तर चुकल्यानंतर बिग बी सुद्धा हैराण झाले. इतकंच नाही तर "मुलीला हे सुद्धा माहित नाहीये की वडिलांना कोणता पुरस्कार मिळालाय. आम्हाला सांगण्यात आलं होतं जो समोर बसलाय त्याने वडिलांची भूमिका साकारलीये त्यामुळे जरा सोपे प्रश्न विचारा. आता एवढा सोपा प्रश्न विचारला तरी तिला उत्तर देता आलं नाही", असं अमिताभ बच्चन म्हणाले. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानबॉलिवूडटेलिव्हिजनअमिताभ बच्चन