Join us

संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:55 IST

इंडियन आयडॉल फेम पवनदीप राजनची प्रकृती आता कशी आहे? त्याच्या जीवावरील धोका टळला का? याविषयी गायकाच्या टीमने सविस्तर माहिती सांगितली आहे

'इंडियन आयडॉल' या शोचा विजेता आणि गायक पवनदीप राजनचा (pawandeep rajan) काल भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं. पवनदीपच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला. पवनदीप राजन या अपघतात गंभीर जखमी झाला. अभिनेत्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरु असल्याचं वृत्त समोर येतंय. पवनदीप राजनच्या टीमने गायकाच्या तब्येतीविषयी महत्वाची अपडेट दिली आहे. काय आहे पवनदीपची हेल्थ अपडेट?

पवनदीपला ICU मध्ये केलं शिफ्ट

पवनदीपचा सोमवारी कार अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. पवनदीपच्या टीमने नुकतंच गायकाची हेल्थ अपडेट सर्वांना सांगितली आहे. पवनदीप सध्या ICU मध्ये असून त्याच्या शरीरात अनेक फ्रॅक्चर आढळले आहेत. हा अपघात झाल्यावर पवनदीपला तत्काळ दिल्ली एनसीआर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. कालचा दिवस (सोमवार) पवनदीपच्या संपूर्ण परिवारासाठी कठीण काळ होता. संपूर्ण दिवस पवनदीप बेशुद्ध अवस्थेत होता. परंतु काल संध्याकाळी ७ च्या सुमारास पवनदीपचं यशस्वी ऑपरेशन करण्यात आलं. ६ तासांच्या ऑपरेशननंतर पवनदीप सध्या ICU मध्ये आहे. 

सध्या पवनदीपला ३ - ४ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये ठेवणार आहेत. वेळीच ऑपरेशन झाल्याने पवनदीपच्या जीवाला असलेला धोका टळला आहे. ही बातमी कळताच पवनदीपच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पवनदीपच्या गाडीचा अपघात अमरोहा जिल्ह्यातील गजरौला भागात झाला. गजरौला येथील नॅशनल हायवे ९ ला मध्यरात्री हा अपघात झाला. पवनदीप त्याचं घर अर्थात उत्तराखंडहून दिल्लीला येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी ड्रायव्हरचा डोळा लागल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे कार कंटेनरला जाऊन धडकली.  यामध्ये पवनदीपच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने पवनदीप यातून बचावला. परंतु त्याच्या दोन्ही हाताला गंभीर जखम झाली आहे. या दुर्घटनेत पवनदीप आणि त्याचे २ मित्रही जखमी झाले आहेत.

टॅग्स :इंडियन आयडॉलअपघातसंगीत