Indian Idol 15 Winner: टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल १५' (Indian Idol 15)चा रविवारी ६ एप्रिलला ग्रँड फिनाले पार पडला. पश्चिम बंगालची २४ वर्षीय मानसी घोष यंदाच्या पर्वाची विजेती ठरली. मानसीने तिच्या सुमधूर आवाजाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांसह परिक्षकांनाही भुरळ घातली होती. इंडियन आयडॉलची ट्रॉफी नावावर केल्यानंतर मानसीने या शोबाबत खुलासा केला आहे.
'इंडियन आयडॉल १५'ची विजेती ठरल्यानंतर मानसीने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिला "'इंडियन आयडॉल' स्क्रिप्टेड असतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिने नेमकं सत्य काय आहे, याचा खुलासा केला. ती म्हणाली, "नाही, हा शो स्क्रिप्टेड नाही. आधीपासूनच काहीच ठरवलेलं नसतं. तुम्हाला गायला लागतं आणि तुम्ही गाणं गायल्यानंतर प्रेक्षक वोट करतात. त्यानंतरच तुम्ही विजेता ठरता".
मानसीला किती मिळालं बक्षीस?
पश्चिम बंगालच्या मानसी घोषची विजेती म्हणून घोषणा झाल्यानंतर तिला आयडॉलची ट्रॉफी तर मिळाली. शिवाय १५ लाख रुपये प्राईज मनीही मिळाली. तसंच एक कारही प्राईजमध्ये मिळाली. मानसीने 'इंडियन आयडॉल १५'चं विजेतेपद मिळवण्याबरोबरच एक बॉलिवूड गाणंही रेकॉर्ड केलं आहे. "मला विश्वास बसत नाहीए की मी ट्रॉफी जिंकली. आई, बाबा, माझे गुरु, परीक्षक, आणि प्रेक्षकांचं मला खूप प्रेम मिळालं. मी हा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही, धन्यवाद." अशी तिने प्रतिक्रिया दिली.
मानसीसोबत स्नेहा शंकर, सुभजीत चक्रवर्ती, अनिरुद्ध सुस्वरम, प्रियांशु दत्ता आणि चैतन्य देवधे हे पाच स्पर्धक 'इंडियन आयडॉल १५'च्या फिनालेपर्यंत पोहोचले होते. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या मानसीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.