Hukumachi Rani Hi: 'सन मराठी'वरील 'हुकुमाची राणी ही' या नवीन मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. राणी आणि इंद्रजीत या नव्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. मालिकाविश्वात पहिल्यांदाच 'हुकुमाची राणी ही' या मालिकेत 'कामगार दिन' साजरा होताना पाहायला मिळणार आहे. मालिकेत इंद्रजीतचे बाबा म्हणजे जयसिंगराव महाडिक इंद्रजीतला कामगार त्यांचं जीवन कसं जगतात हे दाखवण्यासाठी नकळतपणे त्याला कामगार वस्तीत घेऊन जातात. तिथे गेल्यावर इंद्रजीतला त्या वस्तीमधील परिस्थिती पाहून इंद्रजीतची चिडचिड होते.तर दुसरीकडे राणीला इंद्रजीतने फॅक्टरीचे मालक म्हणून वस्तीत कामगारांसह कामगार दिन साजरा करावा असं वाटतं. राणीच्या इच्छेप्रमाणे इंद्रजीत कामगारांसह हा दिवस साजरा करेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
१ मे रोजी जगभरात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने 'हुकुमाची राणी ही'च्या सेटवर एका खास पद्धतीने दिवस साजरा करण्यात आला. मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका खऱ्या फॅक्टरीमध्ये सुरु आहे. राणीने त्याच फॅक्टरी मधील कामगारांना भेटून त्यांच्यासह गप्पा मारल्या त्यांचं जीवन जवळून अनुभवलं. याबद्दल राणी म्हणजेच अभिनेत्री वैभवी चव्हाण म्हणाली की, "ज्या फॅक्टरीमध्ये आम्ही शूटिंग करतो त्याच फॅक्टरीमधील कामगारांसह हा दिवस साजरा करताना खूप छान वाटलं. कामगारांना भेटून त्यांच्या कामाची पोचपावती दिली. कामगारांसह संवाद साधून राणी ही भूमिका साकारण्यासाठी आणखी मदत झाली. हा दिवस प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसाचा आहे त्यामुळे सर्व प्रेक्षकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."
मालिकेत इंद्रजीतची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय पाटील म्हणाला की, "कामगार दिनानिमित्त प्रत्येक कष्ट करणाऱ्या व्यक्तीला माझा सलाम आहे. आज आम्ही कलाकार स्क्रीनवर दिसतो पण पडद्यामागे जे काम करतात हे सगळं त्यांच्यामुळे शक्य आहे. सेटवर काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो. पण त्यापैकीच आमच्या सेटवरील स्पॉट दादा म्हणजेच आमचे दिलीप मामा कधीच कोणत्या कामाला नाही म्हणत नाहीत. नेहमीच हसतमुखाने आणि आपुलकीने प्रत्येक कलाकाराला चहा, कॉफी देण्याचं काम करतात. कधीच थकत नाहीत आणि त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यांसमोर ठेवून काम करतो."