'बिग बॉस' फेम एजाज खान (Ajaz Khan) त्याच्या 'हाऊस अरेस्ट' शोमुळे वादात अडकला आहे. या शोमधील काही अश्लील क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या शोविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. शो बंद करण्याची मागणीही होत आहे. याप्रकरणी एजाज खान आणि शोविरोधात बजरंग दलकडून एफआयआर दाखल करण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणानंतर उल्लू अॅपकडून माफी मागण्यात आली आहे.
उल्लू अॅपकडून माफीनामा!
"आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 'हाऊस अरेस्ट' शोचे सगळे एपिसोड ३-४ दिवस आधीच डिलीट करण्यात आले होते. टीमने दुर्लक्ष केल्याने आणि काळजी न घेतल्याने हे सर्व घडलं. आम्ही कायद्याचं पालन करतो. त्यामुळे शोमधील जे एपिसोड प्रसारित करण्यात आले, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. तुमच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट लक्षात आणू दिल्याबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो. तरीदेखील यामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा तुमची माफी मागत आहोत".
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रावरिया यांनी अभिनेता एजाज खान, हाउस अरेस्ट वेब शोचे निर्माते राजकुमार पांडे आणि उल्लू अॅप संबंधित अन्य व्यक्तींविरोधात FIR दाखल केली होती. राष्ट्रीय महिला आयोगानेही (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना याआधी समन्स पाठवले होते. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल.