Arjun Bijlani: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अर्जुन बिजलानी.'ये है आशिकी','मिली जब हम तुम','नागिन'यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्याने काम केलं आहे. याव्यतिरिक्त, तो काही वेब सीरिजमध्ये देखील झळकला आहे.अभिनेता असण्यासोबतच अर्जुन एक उत्कृष्ट होस्ट देखील आहे. त्याने डान्स दिवाने हा शो होस्ट केला आहे.मात्र, त्याचा हा प्रवास फार सोपा नव्हता, अर्जुन बिजलानीने त्याच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एका मुलाखतीत अर्जुनने त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये मित्राने फसवणूक केल्याने त्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता, असंही सांगितलं. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "माझ्या वडिलांच्या निधनानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आम्ही त्यावेळी माहिममध्ये राहायचो पण वडील गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली. त्यानंतर आमचं संपूर्ण कुटुंब मालाडमध्ये शिफ्ट झालं. आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. त्या एका रात्रीत सगळंच बदललं."
त्यानंतर पुढे अभिनेत्याने ऑडिशनच्या काळाविषयी सांगताना म्हणाला,"मी रोज ऑडिसनसाठी जाताना आईकडून शंभर रुपये घेऊन जायचो. एक काळ असा होता जेव्हा आम्ही गाडीने सर्वत्र जायचो आणि अचानक मला ट्रेनने प्रवास करण्याची वेळ आली, त्या एका रात्रीत माझं संपूर्ण आयुष्य बदललं होतं.आम्ही माहिममध्ये राहत असताना माझे बरेच मित्र होते. पण,मालाड आमच्यासाठी नवीन होतं तिथे कोणाशीही आमची ओळख नव्हती.त्यावेळी माझा पहिला माझ्या पोर्टफोलिओ बनवण्यासाठी ८,००० रुपयांची गरज होती, त्यासाठी मला माझ्या आईचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. पण जेव्हा मी माझी पहिली कमाई केली, तेव्हा मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे माझ्या आईसाठी दागिने खरेदी केले. "
३५ लाख रुपये घेऊन मित्र फरार...
त्या कठीण प्रसंगाबद्दल अर्जुन म्हणाला, "एका मित्राने माझी मोठी फसवणूक केली होती. त्याने मला ब्लॅक अॅंडव्हाईट मनीबद्दल सांगितलं. तेव्हा माझ्याकडून पैसे घेऊन तो गायब झाला. साल २०१० ची ही गोष्ट आहे, जवळपास ३५ लाख रुपये घेऊन तो गायब झाला. मी ते पैसे घर घेण्यासाठी साठवून ठेवले होते." असा खुलासा अभिनेत्याने केला.