हिना खान हा हिंदी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. गेल्या काही दिवसांपासून हिना ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ती त्याच्यावर उपचार घेत आहे. पण, आयुष्यातील या सर्वात कठीण काळातही तिने जिद्द हरलेली नाही. मोठ्या धीराने हिना याचा सामना करत आहे. हिनाचा आत्मविश्वासही डगमगलेला नाही. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये याचा प्रत्यय आला.
हिनाने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने रॅम्पवॉक केला. यावेळी हिनाने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि भरजरी टॉप परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं दिसलं. या इव्हेंटमधील हिनाचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत रॅम्प वॉक करताना हिना अडखळल्याचं स्पष्ट दिसत आहे. स्कर्ट पायात येऊन हिनाचा दोनदा तोल जातो. मात्र ती पडता पडता वाचते.
पण, तरीदेखील हिना स्वत:चा आत्मविश्वास ढळू देत नाही. हिना लगेच स्वत:ला सावरते आणि स्कर्ट हातात घेऊन रॅम्प वॉक करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हिनाच्या हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या आत्मविश्वासाचं प्रचंड कौतुक होत आहे.