प्रियदर्शनी इंदलकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्रियदर्शनी इंदलकर गेली काही वर्ष विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अशातच एका अभिनेत्रीकडे बघून प्रियदर्शनीने अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं, असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. प्रियदर्शनीने हा सगळा किस्सा एका मुलाखतीत शेअर केला आहे.
प्रियदर्शनी इंदलकरने लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "अमृता सुभाष माझ्या शाळेची. रेणुका स्वरुप गर्ल्स हायस्कूल. शाळेचं ७५ वं अमृत महोत्सवी वर्ष होतं. तेव्हा अमृता सुभाष प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. तेव्हा तिच्याकडे बघून माझे डोळे असे चमकले होते. मलाही आयुष्यात असं काहीतरी गाठायचंय, अशा भावनेने डोळ्यात एक चमक उठली होती."
"तेव्हा मी हे स्वप्न बघितलं होतं की, मला तिच्यासारखं काम करायचंय आणि तिच्याइतकं मोठं व्हायचंय. आणि पुन्हा शाळेत येऊन शाळेतल्या मुलींशी गप्पा मारायच्या आहेत की, मी इथवर कशी पोहोचले, हे त्यांना सांगायचंय. ८ वी ला असताना माझ्या मनात प्रामुख्याने आलं होतं की, मला हेच करायचंय. म्हणजेच अभिनेत्री वगैरे व्हायचंय हे माझ्या मनात खूप आधीपासून होतं."
अमृता सुभाषचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि तिचा आत्मविश्वास पाहून प्रियदर्शनी खूप प्रभावित झाली होती. याच भेटीतून तिला अभिनयाच्या क्षेत्रात आपले भविष्य घडवण्याची प्रेरणा मिळाली. अमृता सुभाषसारखी मोठी अभिनेत्री आपल्या शाळेत आल्याने आणि तिला समोरून पाहिल्याने, प्रियदर्शनीच्या मनात अभिनेत्री होण्याची इच्छा प्रबळ झाली. प्रियदर्शनी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये सहभागी आहे. याशिवाय विविध मराठी आणि हिंदी सिनेमा, वेबसीरिजमध्ये प्रियदर्शनी इंदलकर अभिनय करताना दिसते.