'बिग बॉस १९'मध्ये दिसलेली फरहाना भट या सीझनची सर्वात स्ट्राँग स्पर्धक होती. फरहानाने फायनलमध्ये मजल मारत टॉप २ पर्यंतही पोहोचली होती. मात्र तिला हरवत गौरव खन्नाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. तरी फरहानाला मोठा चाहतावर्ग मिळाला. आपल्या बिंधास्त अॅटिट्यूडसाठी ओळखल्या जाणाऱ्या फरहानाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. शोमध्ये तिने आईच्या घटस्फोटाबद्दलही भाष्य केलं होतं.
फरहाना शोमध्ये म्हणाली होती की ती लहान असतानाच तिच्या आईबाबांचा घटस्फोट झाला होता. ती तिच्या वडिलांना कधीच भेटली नाही. आचा फिल्म विंडोशी बोलताना फरहाना म्हणाली, "मी मोठी झाले मला कळायला लागलं तेव्हा मी एक दोन वेळा आईला दुसरं लग्न कर असं सुचवलं होतं. पण आई म्हणाली की तिला शांततापूर्ण आयुष्य जगायचं आहे. तू कशाला मला अशा गोष्टीत ढकलतेस ज्यातून मी बाहेर पडले आहे असं तिच्या आईने तिला विचारलं होतं. माझ्या आईचा लग्नावरुन विश्वासच उठला होता. घटस्फोटानंतर तिचा नात्यांवरही विश्वास नव्हता."
ती पुढे म्हणाली, "गेल्या ९-१० वर्षांपासून मी आईशी लग्नाबद्दल बोललेले नाही. कारण तिला जर नसेल करायचं तर ती नाहीच करणार. जर मी तिला सतत लग्नाबद्दल बोलले तर तिला वाटेल की मी तिला स्वत:पासून दूर ढकलत आहे. तिच्यामनात अनेक विचार येऊ शकतात. मी नेहमीच आईला हे म्हटलं आहे की आयुष्यातल्या कोणत्याही टप्प्यावर तिला जे करायचं ते ती करु शकते कारण मी तिच्या प्रत्येक निर्णयासोबत तिच्यासोबत आहे."
फरहाना भट 'लैला मजनू' आणि 'नोटबूक' या सिनेमांमध्ये दिसली होती. आता तिला 'बिग बॉस १९'मुळे आणखी प्रसिद्धी मिळाली आहे. फरहाना लवकरच अमाल मलिकसोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.