हसताय ना? हसायलाच पाहिजे असं विचारून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा आणि त्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा डॉक्टर म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून निलेश साबळे घराघरात पोहोचला. नुकतंच 'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व सुरू झालं आहे. मात्र आता शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली आहे. पण, या नव्या पर्वात चाहते डॉक्टरला मिस करत आहेत. "तुम्ही शोमध्ये परत कधी येणार?" अशी विचारणा चाहते करत आहेत.
निलेश साबळेने त्याच्या सोशल मीडियावरुन न्यू लूकचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये डॉक्टर खूर्चीत बसल्याचं दिसत आहे. त्याच्या डोळ्यावर गॉगल आहे आणि फोटोत त्याचा डॅशिंग अंदाज दिसत आहे. निलेश साबळेचा हा नवीन लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. "चर्चा आपलीच असं कॅप्शन निलेशने या फोटोला दिलं आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
"भावा मिस करतोय तुला आपण चला हवा येऊद्या मध्ये तुझ्या शिवाय मजा नाही", "सर तुम्ही चला हवा येऊ द्यामध्ये परत कधी येणार?", "परत या चला हवा येऊ द्यामध्ये...", "तुम्ही लवकर या चला हवा येऊ द्या मध्ये तुमच्याशिवाय शो अपूर्ण आहे" अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेने एक्झिट घेतल्यानंतर आता या शोचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करत आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा कॉमेडीचं गँगवॉर पाहायला मिळत आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे, कुशल बद्रिके यंदाच्या सीझनमध्ये परिक्षक आहेत.