महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी कार्यक्रमातून अनेक कलाकार पुढे आले. काहींची नव्याने ओळख झाली. समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, गौरव मोरे, ओंकार भोजने, असे एकापेक्षा एक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकी एक ईशा डे (Esha Dey) जी नुकतीच 'गुलकंद'सिनेमातही दिसली. ईशाने लंडनच्या ड्रामा स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने तिथला अनुभव सांगितला.
'आवाहन' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ईशा डे म्हणाली, "खूपच कमाल अनुभव होता. अख्ख्या स्कूलमध्ये मी एकटी भारतीय होते. जरा भीती होती पण खूप शिकायला मिळालं. सुरुवातीचे सहा महिने मी अगदीच गप्पा असायचे. शांतपणे बसून मला शिकवलेलं सगळं कळतंय असा अभिनय करत होते. पण खरंतर मला त्यांचे उच्चारच कळत नव्हते. अभिनयातल्या शंका विचारु शकतो पण मला ते काय बोलतायेत हेच कळत नव्हतं. तर ते कसं विचारु? असं मनात यायचं. मी एकटी भारतीय असल्यामुळे मी अख्ख्या देशाचा भार घेऊन होते. मला असं वाटायचं मी काही चुकीचं विचारलं तर यांना वाटेल की भारतीय असेच असतात."
ती पुढे म्हणाली,"यातच माझे सहा महिने गेले. मग मला कळलं की मी अशीच राहिले तर मला शिकताच येणार नाही. आईवडिलांनी एवढा खर्च करुन मला इथे पाठवलं आहे. मनातलं ओझं मी टाकून दिलं. मग पुढचे दीड वर्ष कमाल गेले. मी खूप शिकले."
ईशा डे नावामागची गंमत
ईशा डेचं खरं आडनाव वडनेरकर असं आहे. मात्र तिने ते बदललं याचं कारण सांगताना ती म्हणालेली की, "लंडनमध्ये असताना तिथे स्टेजनेम, स्क्रीनेनेम घेण्याची पद्धत आहे. कोर्सच्या शेवटी शेवटी आम्ही कास्टिंग ऑडिशन्सला जायला लागलो. तिथे ऑडिशनवेळी मी नाव सांगितल्यावर त्यांना वडनेरकर हे नावच घेता यायचं नाही. त्यातच १५ मिनिटं जायचे. मग ऑडिशनला १० च मिनिटं मिळायचे. मग माझ्या ट्युटरने मला वेगळं नाव ठेवायला सांगितलं. मी आईबाबांशी बोलले. त्यांची परवानगी घेतल्यानंतर मी अखेर ईशा डे हे नाव ठेवलं."