Join us

"शंभर भाग तरी झाले का?", ३ महिन्यांतच मालिका संपल्याने प्रेक्षकांना पडला प्रश्न, म्हणाले- "कलर्स मराठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 11:16 IST

ऑगस्ट महिन्यात दुर्गा ही मालिका सुरू झाली होती. पण, तीन महिन्यांच्या आतच ही मालिका संपली आहे.

छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.कलर्स वाहिनीवर देखील अशोक मा.मा., पिंगा ग पोरी पिंगा या मालिका नव्याने सुरू होणार आहेत. एकीकडे नव्या मालिका सुरू होत असताना दुसरीकडे मात्र अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

कलर्स मराठी वाहिनीवरील अबीर गुलाल ही मालिका बंद होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. अबीर गुलाल बरोबरच दुर्गा या मालिकेनेही आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याबाबत कलर्स मराठी वाहिनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका बंद पडल्याने प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. ऑगस्ट महिन्यात दुर्गा ही मालिका सुरू झाली होती. पण, तीन महिन्याच्या आतच ही मालिका संपली आहे. 

"दुर्गा आली आणि लगेच निघुनही चालली", "अहो शंभर भाग तरी झाले का?", "बघायचं बघायचं म्हणत मालिका संपली पण...", "चांगली मालिका आहे.. दुर्गा..नवीन स्टोरी होती..पण लगेच निरोप.." अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. "कलर्स सगळ्या मालिका बंद का करत आहे?" असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. 

सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गाची गोष्ट या मालिकेतून दाखविण्यात आली होती. या मालिकेत दुर्गाची भूमिका संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे हिने साकारली होती. तर अंबर गणपुले मुख्य नायकाच्या भूमिकेत होता. शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्रदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता