हिना खाननंतर टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. सध्या अभिनेत्री स्टेज २ लिव्हर कॅन्सरशी झुंज देत आहे. दीपिका कॅन्सरवर उपचार घेत असून त्याचा अगदी धिटाने सामना करत आहे. वेळोवेळी ट्रीटमेंट आणि हेल्थ बाबतीतले अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. कॅन्सरवरील उपचारामुळे दीपिकाला अशक्तपणा जाणवत असल्याचं अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओतून सांगितलं आहे.
दीपिका कक्करने काही दिवसांपूर्वीच कॅन्सरवरील उपचारांच्या साइड इफेक्ट्समुळे केस गळती होत असल्याचं सांगितलं होतं. व्हिडीओतून दीपिकाने हा भयानक अनुभव शेअर केला होता. त्यानंतर आता अभिनेत्रीने थकवा जाणवत असल्याचं सांगितलं आहे. दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने नवीन व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये दीपिकाने तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत.
व्हिडीओत दीपिका ट्रेडमिलवर चालत असल्याचं दिसत आहे. पण, ट्रीटमेंटमुळे थकवा येत असल्याने वर्कआऊट करणं शक्य होत नसल्याचं तिने व्हिडीओत म्हटलं आहे. "मला वर्कआऊट करणं शक्य होत नाही कारण मी लगेच थकून जाते. मला अस्वस्थता जाणवू लागते. पण, आज मला थोडं चांगलं वाटत होतं आणि माझ्याकडे काही कामंही नव्हतं. म्हणून मी थोडा व्यायाम करण्याचं ठरवलं", असं दीपिका म्हणाली.
दरम्यान, दीपिकाला मे महिन्यात लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात गेल्यातनंतर कॅन्सर असल्याचं तिला समजलं. त्यानंतर जून महिन्यात दीपिकाची सर्जरी करण्यात आली. १४ तास ही सर्जरी सुरू होती.