Nilesh Sable And Bhau Kadam New Show: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत आघाडी मिळवण्यासाठी वाहिन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते.अलिकडच्या काळात छोट्या पडद्यावर एकामागोमाग एक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नवनवीन विषयांवर आधारित आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी असे अनेक प्रयोग केले जातात. अशातच नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीने नव्याकोऱ्या मालिकेची घोषणा केली आहे.‘ढिंचॅक दिवाळी’ असं या आगामी शोचं नाव आहे.विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी या शोच्या माध्यमातून भाऊ कदम आणि निलेश साबळेंची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
भाऊ कदम आणि निलेश साबळेंची जोडी जमणार...
नुकत्याच स्टार प्रवाह वाहिनीवर 'लपंडाव' आणि 'नशीबवान' या नवीन मालिका सुरु झाल्या आहेत.त्यानंतर आता येत्या १२ ऑक्टोबरपासून भाऊ कदम आणि निलेश साबळे यांचा ढिंचॅक दिवाळी या नव्या शोला सुरुवात होणार आहे. नुकताच वाहिनीने याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'चला हवा येऊ द्या' मधून भाऊ कदम आणि निलेश साबळे यांच्या एक्झिटनंतर प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. अखेरीस बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही जोडी रसिकांना खळखळून हसवायला सज्ज झाली आहे.
सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की,"ऐतिहाsहाsहाsसिक... ढिंचॅक दिवाळी...मिळणार बोनस मनोरंजनाचा...‘ढिंचॅक दिवाळी’...",अशा हटके कॅप्शनसह वाहिनीने या कॉमेडी शोचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमधील भाऊ कदम आणि निलेश साबळेंचा लूक पाहून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार येवढं मात्र नक्की.