Join us  

दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:35 AM

पती निखिल पटेलचे एका मुलीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा तिने खुलासा केला.

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या वैयक्तिक आयुष्यात संकटांचा सामना करत आहे. शालीन भनोतसोबतचं पहिलं लग्न मोडलं. त्यांना जेडन हा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी दलतीतने केनियाच्या निखिल पटेलसोबत (Nikhil Patel) लग्नगाठ बांधली. त्यालाही पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दलजीत या दुसऱ्या लग्नात खूप आनंदात दिसत होती. लग्न, हनिमूनचे फोटोही तिने पोस्ट केले होते. मात्र लग्नानंतर 10 महिन्यातच दलजीत लेकाला घेऊन भारतात परतली. नुकतंच तिने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड केलं आहे. दलजीतचे चाहते तिला पाठिंबा देत आहेत.

दलजीत कौरने नुकतंच ब्रायडल फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं. मात्र या फोटोंच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं. दलजीतने बऱ्याच दिवसांनी मौन सोडत दुसरं लग्न मोडल्याचं जाहीर केलं. पती निखिल पटेलचे एका मुलीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा तिने खुलासा केला. दलजीतने काल आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिले, 'माझे कपडे, माझा चूडा, माझं मंदिर, माझं सगळं सामान तिकडे आहे. माझं ते घर आहे. माझ्या मुलाचे कपडे, पुस्तकं आणि वडिलांप्रती आशा...सगळं तिथेच आहे. माझं सासर...माझ्या हातांनी बनवलेला फोटो तिथल्या भिंतीवर आहे. पती म्हणतोय की ते माझं घर नाही. लग्न कधी झालंच नाही असं म्हणतो आहे. ते नक्की माझं घर आहे? SN तुला काय वाटतं? निखिल माझा पती आहे? तुलाही असं वाटतं का की आमतं लग्न झालंच नाही?'

दलजीतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत 'निखिलविरोधात केस फाईल कर, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे', 'तू तर इतकी सुंदर आहेस कशाला त्या म्हाताऱ्याच्या मागे जाते' अशा कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. 

दलजीत आणि निखिलमधला हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. दलजीत अखेर मौन सोडत निखिलविरोधात आवाज उठवत आहे. यावर निखिल पटेलची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे. निखिल बिझनेसमन असून केनियामध्येच स्थायिक आहे. 

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकारघटस्फोटलग्नसोशल मीडिया