'बिग बॉस ओटीटी २'चं विजेतेपद मिळवून चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने युट्यूबरला मोठा झटका दिला आहे. रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज आणि सापाचे विष वापरल्याच्या प्रकरणात आरोपपत्र आणि समन्स रद्द करण्याची एल्विश यादवची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
एल्विशने आपल्यावरील आरोपपत्र रद्द करण्यासाठी अपील केले होते. परंतु, खटल्याची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने त्याची मागणी फेटाळून लावली. सोमवारी, न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांनी एल्विशच्या रेव्ह पार्टी, ड्रग्ज आणि सापाचे विष वापरल्याच्या प्रकरणात निकाल दिला. या प्रकरणात, ३ नोव्हेंबर २०२३ रोजी, नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये युट्यूबर एल्विश यादवसह काही लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने त्याची याचिका फेटाळून लावताना म्हटले की, आरोपपत्र आणि एफआयआरमध्ये यादव याच्याविरुद्ध विधाने आहेत आणि अशा आरोपांची सत्यता खटल्यादरम्यान तपासली जाईल. एल्विश यादव याने याचिकेत एफआयआरला आव्हान दिलेले नाही, तसेच आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिकाकर्त्याकडे पुरेसे कारण नाही, असेही न्यायाधीशांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय? पीएफए संघटनेचे प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी या एल्विश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या सर्वांवर रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज, सापाचे विष वापरणे आणि जिवंत सापांसह व्हिडीओ बनवल्याचा आरोप होता. एल्विश यादव याच्या वतीने ज्येष्ठ वकील नवीन सिन्हा यांनी वकील नमन अग्रवाल यांच्या मदतीने वकील निपुण सिंह यांच्यासमवेत युक्तिवाद केला की, एल्विश यादवविरुद्ध एफआयआर दाखल करणारी व्यक्ती वन्यजीव कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यास सक्षम नाही. तसेच एल्विश यादव त्या पार्टीत उपस्थित नव्हता, असेही त्यांनी म्हटले.