Kapil Sharma: 'द कपिल शर्मा शो' या विनोदी कार्यक्रमाने आजपर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला या त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. या कोमॅडी शोनच्या माध्यमातून अनेक चित्रपटांचं प्रमोशन करत त्याबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा या शोचा प्रयत्न असतो. परंतु हा शो सध्या वादात सापडला आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. भर कार्यक्रमात दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्या लूकवर बोललं गेल्याचं नेटकऱ्याचं म्हणणं आहे.
दरम्यान, अलिकडेच 'बेबी जॉन' चित्रपटाची संपूर्ण टीमने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्यासह अभिनेता वरुण धवन, वामिका गब्बी आणि किर्ती सुरेशने देखील हजेरी लावली. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान संपूर्ण स्टारकास्ट एकत्र पाहायला मिळाली. पण, सोशल मीडियावर या शोमधील व्हायरल होणारा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्माने दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्यावर वर्णद्वेषी कमेंट केल्याची टीका नेटकरी करत आहेत. त्यावर आता कपिल शर्माने मौन सोडलं आहे.
कपिल शर्माने एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलंय की ,"कृपया तुम्ही मला सांगाल का, मी केव्हा आणि कुठे त्याच्या लूकबद्दल बोललो आहे. सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका. तुम्ही स्वत: हा आधी हा एपिसोड पाहा आणि मग काय ते ठरवा. उगाच काहीही बोलू नका." अशा शब्दात कपिलने ट्रोलर्सकडून उत्तर मागितलं आहे.
अॅटली कुमार हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. 'जवान' या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करून त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर आता ते 'बेबी जॉन' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या २५ डिसेंबरला म्हणजेच नाताळच्या दरम्यान हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.