टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस १९’चा ग्रँड प्रीमिअर आज शानदार पद्धतीने पार पडणार आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी असणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच ‘बिग बॉस १९’मधील एका स्पर्धकाच्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हा स्पर्धक बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. तो म्हणजे अमाल मलिक. गायक-संगीतकार अमाल मलिक ‘बिग बॉस १९’मध्ये एन्ट्री घेण्याची दाट शक्यता आहे. त्याविषयीचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
प्रोमोमध्ये काय आहे?
प्रोमोमध्ये एका स्पर्धकाचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे आणि तो ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील ‘कौन तुझे’ हे गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं अमाल मलिकनेच संगीतबद्ध केले असल्यामुळे, चाहत्यांनी तोच स्पर्धक असल्याचा अंदाज लावला. या चर्चेला आणखी पुष्टी मिळाली, जेव्हा अमालचे वडील डब्बू मलिक यांनी या प्रोमोवर हात वर केल्याचे इमोजी पोस्ट करुन कमेंट केली. अनेकांनी ही कमेंट पाहून अमाल खरंच ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी होणार, अशी अटकळ बांधायला सुरुवात केली आहे.
‘बिग बॉस १९’ आज २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अमाल मलिक सोबतच झीशान कादरी, बसीर अली आणि अभिषेक बजाज यांसारख्या कलाकारांची नावेही स्पर्धक म्हणून चर्चेत आहेत. अमाल मलिक खरोखरच या शोमध्ये सहभागी होणार की नाही, हे शो सुरू झाल्यावरच स्पष्ट होईल. ‘बिग बॉस १९’ आज ९ वाजता जिओ+ हॉटस्टारवर बघायला मिळेल, याशिवाय १०.३० वाजता कलर्स टीव्हीवर बघता येईल. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी असणार, याची उत्सुकता शिगेला आहे.