Join us

"घरातील माझा प्रवास संपला असला तरी...",'बिग बॉस'मधून बाहेर येताच इरिनाने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:18 IST

इरिनाने घराबाहेर येताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Bigg Boss Marathi Irina Rudakova Elimination : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पाडला. रविवारी चौथ्या आठवड्यातील एविक्शन झालं. या एविक्शनमधून 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा (Irina Rudakova) घराबाहेर गेली आहे. भावुक होत इरिनाने या घराचा निरोप घेतला. इरिनाने घराबाहेर येताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

इरिनाने तिच्या इन्स्टाग्रामस्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहलं, "बिग बॉसच्या घरात घालवलेले दिवस हा एक अविस्मरणीय प्रवास राहिला.  या सर्व क्षणांसाठी मी माझ्या घरातील सदस्यांची मनापासून आभारी आहे. या अतुलनीय संधीसाठी आणि माझा अनुभव इतका खास बनवल्याबद्दल 'बिग बॉस' टीमचे खूप खूप आभार आणि तुमचेही, ज्यांनी मला आनंद दिला. तुमचे प्रेम आणि पाठिंबा ही माझी शक्ती आहे. घरातील माझा प्रवास संपला असला तरी ही एक नवीन सुरुवात आहे. भविष्य मला कुठे घेऊन जाते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. फक्त तुमचीच #MumbaichiBarbie", या शब्दात तिने भावना व्यक्त केल्या. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात इरिना हिने महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकण्याचा पुर्ण प्रयत्न केला आणि त्यात तिला यशही आले. मात्र, या खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत तिला टिकता आलं नाही. मराठी नसलेली इरिना इथल्या संस्कृतीशी स्वत:ला जोडून घेताना दिसून आली. इरिनाचे मराठी उच्चार स्पष्ट नसले तरी तिचं बोलणं ऐकणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा विषय झाला होता. शिवाय तिने 'बिग बॉस'च्या घरात मराठी शिकण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं. 

दरम्यान 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यंदा घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला होता. यापैकी पुरुषोत्तम दादा पाटील यांनी पहिल्याच आठवड्यात घराचा निरोप घेतला. यानंतर दुसऱ्या आठवड्यात एकही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. परंतु, तिसऱ्या आठवड्यात सर्वांनाच धक्का मिळाला. 'बिग बॉस मराठीच्या घरातून एक नव्हे तर योगिता चव्हाण आणि निखिल दामले असे दोन स्पर्धक बेघर झाले होते. आता इरिनादेखील घराबाहेर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता वाईल्ड कार्ड एन्ट्रीची उत्सुकता लागली आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीकलर्स मराठी