Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच दिपाली सय्यदला धक्का; अजित पवारांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 14:55 IST

दीपाली सय्यदनं अजित पवारांना श्रद्धांजली देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Deepali Sayyad Reaction On Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी आठ वाजता अजित पवार विशेष विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना त्यांचे विमान कोसळले होते. या दुःखद घटनेनंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि सामान्य नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पण, या घटनेबद्दल 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात असेल्या स्पर्धकांना माहिती नव्हतं. आता शो संपवून घराबाहेर पडल्यानंतर अभिनेत्री दीपाली सय्यद हिला ही बातमी समजताच तिला मोठा धक्का बसला.

दीपाली सय्यदनं अजित पवारांना श्रद्धांजली देत आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकमत फिल्मीशी बोलताना दीपाली म्हणाली, "तीन महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. बाहेर आल्यावर कळलं की अनेक माणसं सोडून गेली आहेत. जेव्हा अजित दादांच्या निधनाचं वृत्त समजलं, तेव्हा खूप वाईट वाटलं. ज्या पद्धतीने दादा गेले, ते खरोखरच धक्कादायक आहे. कुणीही असा विचार करू शकत नाही की दादांसारखा माणूस, जो सदैव सर्वांचा विचार करायचा, त्यांचा अंत असा होऊ शकतो".

अजित दादांसोबतच्या एका खास आठवणीला उजाळा देताना दीपाली म्हणाली, "जेव्हा मी पहिली महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हा माझा एक हट्ट होता. ज्याप्रमाणे पुरुष 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यांना डीवायएसपी (DYSP) पद किंवा सरकारी नोकरी मिळते, तशीच संधी महिला कुस्तीगिरांनाही मिळावी".

पुढे ती म्हणाली, "त्यांच्याकडे हा जीआर पास करण्याचे अधिकार होते. मी हा विषय दादांच्या कानावर टाकला होता. त्यांनी मला वेळही दिली होती आणि सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 'तू ये, आपण यावर मार्ग काढू' असं त्यांनी सांगितलं होतं. मला खात्री होती की हे काम दादांकडे झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं. आज हे काम अर्धवट राहिल्याची रुखरुख मनाला लागली आहे".

राजकारणातील संघर्षावर भाष्य करताना दीपाली म्हणाली की, "पॉलिटिक्स जितकं लांबून सोपं वाटतं, तितकं ते नसतं. राजकारणात कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं, हे ज्याचं त्यालाच माहित असतं. दादा जिथे असतील तिथे त्यांना शांतता लाभो, हीच मनापासून प्रार्थना आहे", या भावना दीपाली सय्यदने व्यक्त केल्या.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Deepali Sayyad shocked by Ajit Pawar's death after Bigg Boss exit.

Web Summary : After leaving Bigg Boss Marathi, Deepali Sayyad learned of Ajit Pawar's tragic death in a plane crash. Deepali expressed her grief, recalling Pawar's support for women wrestlers and acknowledging the hidden struggles of politicians. She wished peace for him.
टॅग्स :दीपाली सय्यदबिग बॉस मराठी ६अजित पवार