मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येक जण दिवसरात्र मेहनतही करत असतो. पण, मुंबईतील घराच्या किमती पाहता हे सहज शक्य नाही. मुंबईत घर घ्यायचं म्हटलं तर अनेकांच्या नाकीनऊ येतात. मात्र एका हिंदी अभिनेत्रीने मुंबईत एक नव्हे तर केवळ तीन घरं खरेदी केली आहेत. ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस फेम गौहर खान आहे.
गौहर खानने मुंबईतील वर्सोवा येथे तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. शीव कुटीर को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या बिल्डिंगमध्ये गौहर खानने हे तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. या तीनही फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे. १४ आणि १५व्या मजल्यावर गौहर खानचे हे फ्लॅट आहेत. यातील दोन फ्लॅट हे गौहर खान आणि तिचा पती यांनी मिळून विकत घेतले आहेत. तर तिसरा फ्लॅट हा गौहर खानच्या नावावर आहे.
दोन फ्लॅट हे २,३९३ स्क्वे. फूट भागात पसरलेले आहेत. या दोन फ्लॅटची किंमत ही ७.३३ कोटींच्या घरात आहे. तर गौहर खानच्या नावावर असलेला फ्लॅट हा १,१०४ स्क्वे. फूट परिसरात पसरलेला आहे. याची किंमत २.८० कोटी इतकी आहे. हे तीनही फ्लॅट गौहर खानने १०.१३ कोटींना विकत घेतले आहेत.
गौहर खानने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'बिग बॉस', 'झलक दिखलाजा' या रिएलिटी शोजमध्ये ती सहभागी झाली होती. 'बिग बॉस ७'ची गौहर खान विजेती होती. 'इशकजादे' या सिनेमातील आयटम साँगमुळे ती चर्चेत आली होती.