‘बिग बॉस १६’ मधून प्रसिद्ध झालेला ताजिकिस्तानी गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अब्दू रोजिकला दुबईविमानतळावरअटक करण्यात आली आहे. तो परदेश प्रवास करुन दुबईला परतत असताना ही घटना घडली. विमानतळावर चोरीच्या आरोपाखाली त्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. अब्दू रोजिकच्या टीमने या घटनेविषयी सांगितलं की, त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे, परंतु नेमका प्रकार काय होता, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दुबई पोलिसांकडूनही अद्याप कोणतं अधिकृत विधान करण्यात आलेलं नाही.अब्दू रोजिकला अटक, कारण?
अब्दू रोजिक हा छोट्या उंचीमुळे प्रसिद्ध असलेला कलाकार आहे. मात्र त्याच्या गायन शैलीमुळे आणि वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे त्याने सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. भारतात ‘बिग बॉस १६’ मधून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने ‘लाफ्टर शेफ्स’सारख्या कार्यक्रमांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता दुबईतील अटकेमुळे अब्दू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वीही २०२४ साली भारतात त्याच्याकडून काही आर्थिक चौकशी करण्यात आली होती, मात्र तेव्हा कोणतीही कारवाई झाली नव्हती. या वेळी मात्र त्याला थेट अटक करण्यात आली असून, तो सध्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे.
या घटनेचा पुढील तपास सुरु असून पोलिसांनी केलेल्या पोलिसांच्या कायदेशीर कारवाईनंतरच त्याच्यावरील आरोपांबाबत अधिक माहिती समोर येईल, असं व्यवस्थापनाने सांगितलं आहे. अब्दूचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या समर्थनात पोस्ट करत असून, त्याने कोणतीही चोरी केली नसेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. अब्दूने काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचा फोटोही पोस्ट केला होता. त्याने वैयक्तिक आयुष्यात लग्न केलं, अशी चर्चा होती.