Bigg Boss 19: टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त ठरलेला पण तितकाच गाजलेला एकमेव रिएलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. यंदाच्या पर्वात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिलादेखील 'बिग बॉस'ची ऑफर होती असा खुलासा केला आहे. दरवर्षी 'बिग बॉस'च्या नव्या पर्वासाठी विचारणा होत असल्याचंही तनुश्रीने म्हटलं आहे.
तनुश्री दत्ताने बॉलिवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत 'बिग बॉस'बद्दल भाष्य केलं. तसंच या शोला नकार देण्याचं कारणही सांगितलं. तनुश्री म्हणाली, "मला गेल्या ११ वर्षांपासून 'बिग बॉस'च्या ऑफर येत आहेत. ते दरवर्षी मला विचारतात आणि मी प्रत्येकवेळी त्यांना नकार देते. मी अशा ठिकाणी राहू शकत नाही. मी माझ्या कुटुंबासोबतही राहत नाही. त्यांनी मला शोसाठी १.६५ कोटींची ऑफर दिली होती. कारण, त्यांनी माझ्याच सारख्या आणखी एका अभिनेत्रीलाही एवढे पैसे ऑफर केले होते".
"त्यांनी मला चंद्र आणून दिला तरी मी 'बिग बॉस'मध्ये जाणार नाही. महिला आणि पुरुष एकाच बेडवर झोपतात. एकाच ठिकाणी भांडण करतात...मी असं नाही करू शकत. मी माझ्या डाएटची खूप काळजी घेते. एका रिएलिटी शोसाठी कोणत्याही मुलासोबत एकच बेड शेअर करेल, अशी मुलगी मी नाही. मग कितीही कोटी द्या. पण मी एवढी नीच नाही", असंही तनुश्री म्हणाली.