Bigg Boss 19: बिग बॉस १९च्या घरात यंदा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी एन्ट्री घेतली आहे. अभिनेत्री कुनिका सदानंदही बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आहे. अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी कुनिका तिच्या लव्ह लाइफमुळेही तितकीच चर्चेत होती. कुमार सानूसोबतचं तिचं रिलेशनशिप चांगलंच गाजलं होतं. कुनिकाचा मुलगा अयानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.
अयानने सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यात त्याने आईच्या लव्ह लाइफबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, "मला कूल वाटायचं कारण जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या तेव्हा माझ्या आईचेही बॉयफ्रेंड होते. माझ्या वडिलांसोबत तिचा घटस्फोट झाला होता. पण तिने आमच्यातील अंतर हे असं मिटवलं होतं". अयानने या पॉडकास्टमध्ये कुमार सानू आणि कुनिकाच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. कुमार सानू यांना मी कधी भेटलो नाही. पण, त्यांच्या मुलांना मी भेटलो आहे. जानसोबत मी वेळ घालवला आहे. त्याने मला भावासारखं ट्रीट केलं होतं. त्याच्यासोबत माझा फोटोही असेल", असं त्याने सांगितलं.
पुढे अयान म्हणाला, "माझी आई घरात सतत त्यांची गाणी गायची. मी तेव्हा कुमार सानू यांचं नाव गुगल सर्च केलं होतं. जेव्हा मी गुगल सर्च तेव्हा मला कळलं की ते रिलेशनशिपमध्ये होते. खूप लोक म्हणतात की त्यांचं २७ वर्षांचं रिलेशनशिप होतं. पण, जर तुम्ही नीट ऐकलं तर कळेल की माझी आई म्हणते की ती तेव्हा २७ वर्षांची होते. माझा जन्म ती ३५ वर्षांची असताना झाला. ती आजही कुमार सानूची गाणी गाते. ती कलाकारावर प्रेम करते. त्याच्या कलेवर प्रेम करते. त्या व्यक्तीवर नाही. मी नंतर आईला कुमार सानूबद्दल विचारलं होतं. तेव्हा तिने मला सांगितलं होतं की ती माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. मी त्याच्याकडे माझा लाइफ पार्टनर म्हणून बघायचे. असं प्रेम प्रत्येकाला एकदा तरी मिळालं पाहिजे. त्यांचं प्रेम टॉक्झिक होतं".