Join us

"मी बिग बॉसच्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही...", सलमानच्या शोमध्ये जाण्यास मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:37 IST

काही दिवसांतच 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. आता यंदाच्या पर्वात कोणचे स्पर्धक दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावंही समोर येत आहेत. पण या शोमध्ये जाण्यास अभिनेत्रीने नकार दिला आहे.

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अतिशय वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय ठरलेल्या 'बिग बॉस' या रिएलिटी शोच्या पुढच्या पर्वाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नुकतंच या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांतच 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. आता यंदाच्या पर्वात कोणचे स्पर्धक दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावंही समोर येत आहेत. 

'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री अनुषा दांडेकरही सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण, सलमान खानच्या शोमध्ये जाण्यास अनुषाने स्पष्ट नकार दिला आहे. अनुषाने न्यूज १८शी बोलताना कधीच 'बिग बॉस'च्या घरात पाऊल ठेवणार नसल्याचं म्हटलं आहे. "प्रत्येक वर्षी ही चर्चा होते की मी बिग बॉसमध्ये जातेय. यावेळेस मी पुन्हा सांगते की नाही. मी बिग बॉसच्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. कृपया हे लक्षात ठेवा", असं अनुषा म्हणाली. 

"दरवर्षी बिग बॉस सुरू होण्याच्या आधी मी शोमध्ये जाणार असल्याची अफवा पसरते. मी आजपर्यंत कधीच 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. ना मला कधी 'बिग बॉस'च्या टीमकडून याबाबत विचारणा झाली. मला या शोमध्ये जायचं नाही हा माझा पर्सनल चॉइस आहे. जे लोक या शोमध्ये जातात ते खूप स्ट्राँग असतात असं मला वाटतं. पण, मला कधीच या शोमध्ये जाण्यात इंटरेस्ट नव्हता", असंही पुढे अनुषाने सांगितलं.

'बिग बॉस १९' हे पर्व येत्या २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस १९'चा लोगोही बदलण्यात आला आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक दिसतील, याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.

टॅग्स :बिग बॉसअनुषा दांडेकरटिव्ही कलाकार