Join us

बिग बॉस मराठी २ : अन् रूपाली भोसले झाली भावूक, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:46 IST

बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये रुपाली भोसले ही सहभागी झाली आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झालेल्या बिग बॉस मराठी सीजन २ चे आता बिगुल वाजले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या शो द्वारे हिंदी मालिकेत झळकलेली मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसलेने सहभाग घेत मराठीत पुनरागमन केले आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉस शोच्या ग्रँड प्रीमियरमध्ये महेश मांजरेकर यांनी रुपालीला तिचा भाऊ संकेत भोसलेसोबत घडलेल्या आपबितीबद्दल तिला विचारले. 

त्यावेळी रुपालीने सांगितले, बाईक अपघातात रुपालीचा भाऊ संकेतच्या पायाला जबरदस्त मार बसला होता, ज्यावेळी ही बातमी रुपालीला समजली, त्यावेळी तिचे हिंदीतील सर्वात पहिले आणि तिच्या करिअर साठी महत्वाचे असे शूट होते. तसेच, त्वरित औषध पाणी केले नाही तर पाय कापावे लागतील असे निदान डॉक्टरांनी केले असल्या कारणामुळे, भावाला जखमी अवस्थेत सोडून देणे देखील तिला शक्य नव्हते. त्यात शस्त्रक्रियेसाठी पैसेदेखील तिच्याकडे नव्हते. त्यामुळे हातचे काम सोडले तर पैसाचा बिकट प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या रुपालीला कोणत्याही परिस्थिती भावाचे पाय वाचवायचे असल्यामुळे तिने नानाविध प्रयत्न केले. अखेर, तिच्या प्रयत्नांना यश आले. तिच्या सहकारी मित्रांकडून आर्थिक मदत घेऊन रुपालीने भावाला पुन्हा एकदा उभे केले. शिवाय, हिंदी मालिकेतली यशस्वी अभिनेत्री म्हणून तिने आपली ओळख देखील संपादित केली. 

'माझ्या भावाच्या पाठीशी मी त्यावेळी खंबीरपणे उभी राहू शकली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो' असे भावोद्गार तिने यावेळी काढले.

इतकेच नव्हे तर, रुपाली हे सगळं सांगत असताना तिच्या भावाने बिग बॉस मराठी २ च्या मंचावर येऊन तिला सरप्राईज दिले.

भोसले भाऊ-बहिणीची गळाभेट सर्वांना भावूक करून गेली.

टॅग्स :बिग बॉस मराठीरुपाली भोसलेमहेश मांजरेकर