'भाभीजी घर पर है'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन झालं आहे. ते ४९ वर्षांचे होते. रविवारी(२३ मार्च) त्यांनी सिकंदराबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. यकृताच्या आजाराने ते ग्रस्त होते. त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांटही करण्यात येणार होतं. मात्र त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मनोज संतोषी यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली असून 'भाभीजी घर पर है'मधील कलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मनोज संतोषी यांच्या निधनानंतर 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने प्रतिक्रिया देत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. "मनोज संतोषी यांचा जीव डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला आहे. ते त्यांना वाचवू शकत होते", असं शिल्पा शिंदेंने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.
शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर आरोप
मनोज जी लवकर बरे व्हावेत असं मला वाटत होतं. सेटवरच्या सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली होती. पण, संतोषजी थोडे हट्टी होते. ते नेहमी एकटे राहायचे. ते कोणाचंही ऐकायचे नाहीत. आम्हाला जसं कळलं आम्ही अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचे रिपोर्ट पाहिल्यानंतर सांगितलं होतं की आयुर्वेद सध्या काम करणार नाही. कोणतीही गोष्टी फक्त आयुर्वेदामुळे १०० टक्के पूर्णपणे बरी होऊ शकत नाही. आम्ही काही गोष्टी केल्या. त्या सक्सेसफूलही झाल्या. पण, कोणी कुटुंबीय नाही म्हणून डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही.
मी मध्ये २ दिवस कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. हॉस्पिटल म्हणजे फक्त पैसे कमवण्याचा धंदा आहे. मेलेल्या व्यक्तीचं पण डायलिसिस करत आहेत. आम्ही एवढे मुर्ख नाही की तुम्ही काय करताय हे आम्हाला कळणार नाही. मी मुंबईला आल्यानंतर मला फोन आला होता की लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ऑर्गन मिळालं आहे. सकाळी अचानक ६ वाजता मला फोन आला की ते कोमामध्ये गेले. आदल्याच दिवशी मनोजजी माझ्याशी बोलले होते. मी जेवत आहे, मी चालत आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी सगळी मेहनत मी घेणार आहे, असं ते म्हणाले.
सकाळी ६ वाजता डॉक्टरांनी सांगितलं की ते कोमामध्ये गेले आहेत आणि त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करावं लागेल. लिव्हरमुळे त्यांची किडनी डॅमेज झाली होती. मी डॉक्टरांना किडनीबाबतही विचारलं. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या कुटुंबातील कोणी नाही. त्यामुळे ते फक्त मला दाखवण्यासाठी डायलिसिस करत होते. पण, मला कळून चुकलं होतं की ते जिवंत नाहीत. मी हे यासाठी बोलत आहे कारण असं अनेक लोकांसोबत घडलं आहे.