Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून बबिताची एक्झिट? शूटिंगमधून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 14:59 IST

गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री मुनमुन दत्ता शूटिंगला आली नसल्याचे समजते आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, तारक, दयाबेन, भिडे, बबिताजी अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत बबिताची भूमिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मुनमुन दत्ताने. या भूमिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. तसेच शूटिंगलाही बंदी होती. त्यामुळे बऱ्याच मालिकांनी आपले बस्तान इतर राज्यात हलविले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे शूटिंग दमणमध्ये हलविण्यात आले होते. आता लॉकडाउन उठवल्यानंतर पुन्हा मुंबईत शूटिंगला सुरूवात झाली आहे.

मागील एक महिन्यापासून मुंबईत शूट सुरू आहे पण या कार्यक्रमाच्या शूटिंगमधून मुनमुन गायब आहे. ती एकदा सुद्धा सेटवर आलेली नाही. तिची गैरहजेरी लक्षात घेऊन कथानकही लिहिले जात आहे. अशा परिस्थितीत मुनमुनने शो सोडला असल्याचा तर्क लावला जातो आहे. मात्र मुनमुनने अद्याप तरी मालिका सोडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

यूट्यूब व्हिडिओमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्यामुळे मुनमुन वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वादामुळे तिला तुरूंगात जावे लागले होते. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर कोर्टाने तिच्याविरोधात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आणि तिला दिलासा मिळाला होता. 

टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मा