'बिग बॉस १७' फेम आयेशा खान तिच्या सौंदर्य आणि चांगल्या स्वभावामुळे लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आयेशा आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. 'धुरंधर' सिनेमातील तिने एक आयटम साँग केलं. मात्र तिला सेलिब्रिटी असण्याचा मोठा तोटाही होत आहे. सोशल मीडियावर तिला रोज अनेक अश्लील मेसेज येतात. इतकंच नाही तर तिच्यासोबत बलात्काराचाही प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.
मोजो स्टोरी ला दिलेल्या मुलाखतीत आयेशा खान म्हणाली,"मला जवळपास दररोज माझ्या बॉडीवरुन सोशल मीडियावर घाणेरड्या कमेंट्स येतात. मी नॉर्मल टॉप घातला तरी लोकांना प्रॉब्लेम असतो, स्कर्ट घातला तरी असतो. मला पोस्ट करण्याआधी विचार करायला लागतो. मी काय घालायचं किंवा काय पोस्ट करायचं याआधी लोक काय म्हणतील हा विचार मला करावा लागत असेल तर किती वाईट आहे. कधी मी बिंधास्त पोस्ट करते पण कधी माझा अजिबात असे कमेंट्स वाचायचा मूड नसतो. अशा कमेंट्सवरुन वाटतं की हे लोक नक्कीच बलात्कार करु शकतात. जे ते बोलतायेत ते ते करुन दाखवू शकतात. हे असे लोक आपल्या आजूबाजूला आहेत ही गोष्ट खूप भीतीदायक आहे. या फक्त कमेंट्स नाही तर आसपासची माणसं खरोखरंच तुम्हाला अशा धमक्या देत आहेत. मला रोज बलात्काराच्या धमक्या येतात. आत्ताही मी फोन उघडून दाखवू शकते. हे अगदीच आता नॉर्मल झालं आहे आणि कोणीच काही करु शकत नाही. ट्रोलर्सवर नेहमी मुलाखतींमध्ये प्रश्न विचारले जातात आणि आपण त्यावर उत्तर देतो. त्यांना तेच हवं आहे. हे काही नवीन नाही बऱ्याच वर्षांपासून हे सुरु आहे."
आयेशा पुढे म्हणाली, "माझ्यासोबत एकदा बलात्काराचा प्रयत्नही झाला आहे. ही अशी घटना आहे जी मला विसरायची आहे पण रोजच्या अश्लील कमेंट्समुळे मला सतत ती घटना आठवत राहते. मी याबद्दल एका मुलाखतीत बोललोही आहे. मला परत तेच आठवायचं नाही. पण असे काही दिवस असतात जेव्हा मला ते पुन्हा ट्रिगर होतं. त्या जखमा कधीही भरुन निघणाऱ्या नाहीत. जर मी आज सेलिब्रिटी नसते आणि सुरक्षित नसते तर कदाचित माझ्यासोबत ती घटना पुन्हा घडली असती."
सेटवरही घडलेला प्रकार
"मी एका सिनेमाट्या शूटमध्ये होते आणि माझे वडीलही दिवसभर माझ्यासोबत सेटवर होते. मी सहज इन्स्टाग्राम उघडलं आणि मला एक मेसेज दिसला. ती एक व्हॉइस नोट होती. नंतर मला कळलं की सेटवरील स्पॉटबॉयपैकीच एकाने मला ते पाठवलं होतं. मी लगेच वडिलांना आणि प्रोडक्शनला हे सांगितलं आणि नंतर योग्य ती कारवाई झाली. पण यावरुन पुन्हा हेच दिसून येतं की आजूबाजूला कसे लोक फिरत आहेत."