बिग बॉस १७ मधून प्रसिद्धीझोतात आलेली आयेशा खान(Ayesha Khan). तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचं सौंदर्य आणि क्युटनेसवर चाहते घायाळ होतात. तसंच तिच्या साधेपणाचंही कायम कौतुक होतं. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. घराघरांमध्ये उकडीचे मोदक, पुरणपोळी यांचा आस्वाद घेतला जातोय. आयेशा खाननेही तिच्या मित्रपरिवाराकडे जाऊन मोदक, पुरणपोळीवर ताव मारला. साडी नेसून, केसात गजरा माळून ती छान तयार झाल्याचंही दिसत आहे. आयेशाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात प्रसन्न वातावरण असतं. घरोघरी गणरायाचं आगमन होतं. गल्ली, कॉलनी, सोसायटी सगळीकडे बाप्पा विराजमान होतात. तसंच उकडीचे मोदक हे तर बाप्पाचा आणि त्यामुळे सगळ्यांचाच आवडता पदार्थ. बिग बॉस १७ फेम आयेशा खानने व्हिडिओ पोस्ट केला आहे. ती एकाच्या घरी आली आहे. निळी डिझायनर साडी, सोन्याचे दागिने आणि केसात गजरा असा तिचा लूक आहे. तिच्या हातात ताट आहे. त्यात पुरणपोळी आणि मोदक आहे ज्यावर ती ताव मारत आहे. 'मला वरण भात खायचाय...' असंही ती बोलते. नंतर एक महिला येऊन तिच्या केसात गजरा माळते आणि तिची नजरही काढते.
आयेशाच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. 'आयेशा खान नाही आयेशा पाटील' अशी एकाने कमेंट केली आहे. त्यावर आयेशानेही हसतच रिप्लाय दिला आहे. 'खूपच सुंदर, गोड','मराठी मुलगी' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. आयेशाने काही दिवसांपूर्वी 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरही रील शेअर केलं होतं. त्यात तिने हीच साडी नेसली होती. आयेशाचा हाच साधेपणा चाहत्यांचं मन जिंकून घेत आहे.