अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होणार असल्याच्या आणि पत्नी नेहा स्वामीसोबत घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांवर अखेर त्याने स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अर्जुनने काही दिवसांपूर्वी एक भावनिक पोस्ट शेअर केली होता. ज्यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले होते. त्यात तो म्हणाला होता की, "हॅलो मित्रांनो, जेव्हाही आयुष्यात काही घडतं, तेव्हा मी ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. आताही खूप काही घडलंय ते मला तुम्हाला सांगावंसं वाटत आहे. काही कारणांमुळे मला एक वेगळा रस्ता निवडावा लागत आहे. मी असं कधी करेन असं मला वाटलंही नव्हतं". त्याच्या या व्हिडीओनंतर तो पत्नीपासून वेगळा होणार असल्याच्या किंवा 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
मात्र, आता अर्जुनने त्याच्या पत्नीसोबतचा रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने स्पष्टपणे लिहलं, "मी बिग बॉस करत नाहीये आणि घटस्फोटही घेत नाहीये". त्याने लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच नवीन प्रोजेक्टची घोषणा लवकरच करणार असल्याचं सांगितलं. आता त्याच्या चाहत्यांना सोमवारी होणाऱ्या घोषणेची उत्सुकता लागली आहे.